Govt Offices in Jalgaon working on Sunday in the wake of CM's Tour | Sarkarnama

मुख्यमंत्राच्या दौऱ्यामुळे जळगावात रविवारीही शासकीय कार्यालये फुल्ल 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

राज्यात सत्तांतर होवून नवीन आलेल्या भाजप-सेना सरकारला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील संपूर्ण जिल्ह्यात जावून विकास कामांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक येथून त्याची सुरूवात झाली आहे. आता जळगाव जिल्ह्याचा क्रमांक आहे. उद्या (ता. 8) रोजी ते जळगावात येत आहेत.

जळगाव : शासकीय कार्यालयात कामाच्या दिवशी अनेक विभाग रिकामेच असल्याच्या तक्रारी असतात. सुटीच्या दिवशी तर शुकशुकाटच असतो. परंतू, जळगावात मात्र आज उलटेच चित्र दिसले. रविवार असूनही जळगावातील सर्वच शासकीय फुल्ल आहेत. त्याचे कारणही तसच आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामाचा आढावा घेण्यासाठी उद्या (ता.8)जळगावात येत आहेत. विशेष म्हणजे जळगावातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे कामही महापालिकेतर्फे युध्द पातळीवर सुरू आहे. 

राज्यात सत्तांतर होवून नवीन आलेल्या भाजप-सेना सरकारला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील संपूर्ण जिल्ह्यात जावून विकास कामांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक येथून त्याची सुरूवात झाली आहे. आता जळगाव जिल्ह्याचा क्रमांक आहे. उद्या (ता. 8) रोजी ते जळगावात येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 10 वाजेपासून ते बैठकांना सुरूवात करणार आहेत. जिल्हा प्रशासन,महापालिका, जिल्हा परिषद यांच्या विकासकामाचे आढावा घेणार आहेत. तर कायदा व सुव्यवस्थेसाठी त्यांनी पूर्ण एक तास वेळ दिला असून त्याचा पूर्ण आढावा घेणार आहेत.

त्यामुळे आपआपल्या कामाचा लेखा-जोखा तयार करण्यासाठी प्रत्येक विभाग तयारी करीत आहे. त्यामुळे जळगावातील सर्वच शासकीय कार्यालय आज रविवार असूनही फुल्ल होते. कर्मचारी अगदी कामात मग्न होते. जळगावकरांना हे चित्र अगदीच वेगळे वाटत होते. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यात विकास कामाच्या आढाव्यासोबतच नव्यानेच उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहाचे उद्‌घाटन करतील, तसेच कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नामकरणाचा आनंद सोहळ्याला उपस्थिती देतील. त्यांच्या समवेत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शिक्षणमंत्री विनोद तावडेही उपस्थित राहणार आहेत. 

रस्ते दुरूस्तीचे 'अमृत'ही 
शहरातील रस्त्यात मोठ मोठे खड्डे आहेत.नागरिकांनी त्याबाबत अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. मात्र 'अमृत'योजनेचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्ते दुरूस्तीच नव्हे खड्डेही बुजविले जाणार नाहीत, असे नागरिकांना महापालिकेतर्फे सांगितले जात होते. परंतू, मुख्यमंत्री येणार म्हटल्यावर प्रशासनाने हे कारणही बाजूला टाकून रस्त्याची डागडूजी युध्द पातळीवर सुरू केली आहे. त्यामुळे जळगावकर खूष झाले आहेत. निदान खड्डे बुजविण्यासाठी आणि प्रशासनाला कामास लावण्यासाठी तरी मुख्यमंत्र्यांनी असेच येत रहावे, असे मतही नागरिकाकडून व्यक्त होत आहे.

संबंधित लेख