Govrnment Insulting Shivaji Maharaj by Naming loan waiver | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

कर्जमाफीला छत्रपतींचे नांव हा त्यांचा अपमान: धनंजय मुंडे

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

राज्यातील भाजप सरकार कडून विकासाचा केवळ देखावा केला जात आहे. विकास दिसत नसल्याने आता त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केला आहे. या सरकारचे दाखवायचे व खायचे दात वेगळे आहेत, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी साताऱ्यात केली.

सातारा : राज्यातील भाजप सरकार कडून विकासाचा केवळ देखावा केला जात आहे. विकास दिसत नसल्याने आता त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केला आहे. या सरकारचे दाखवायचे व खायचे दात वेगळे आहेत, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी साताऱ्यात केली.

कर्जमाफीच्या नावाखाली दिखावा केला जात असू या योजनेला छत्रपतींचे नाव देऊन त्यांचा अपमान केला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर जावली तालुक्यात विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंढे यांच्या हस्ते आमदार शिंदे यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला जाण्यापूर्वी मुंडे यांनी साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते.

यावेळी मुंडे म्हणाले, ''सुरवातीपासून भारतीय जनता पक्ष विकासाचा केवळ  देखावा करत असल्याचे राष्ट्रवादीने उघड केले आहे. सरकार सूडबुद्धीने वागत आहे. विकास दिसत नसल्याने आता त्यांनी हिंदुत्वाचा अजेंडा पुढे केला आहे. अगदी पहिल्या अधिवेशनापासून आम्ही भाजपच्या या नीतीला विरोध केला आहे. सरकारचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. त्यामुळे त्यांना आता जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.''

''कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी देण्याचे सांगितले होते. आता दोन शेतकऱ्यांना मुंबईला बोलवून त्यांचा सत्कार करत कर्जमाफीचा दिखावा हे सरकार करत आहे. छत्रपत्ती शिवाजी महाराज यांचे नाव या योजनेला देऊन त्यांचा अपमान या सरकारने केला आहे. शेतीमालाला भाव नाही, पावसामुळे नुकसानी, नोटबंदी, ऐन दिवाळीत रेशनवरील साखर बंदी, पेट्रोल डिझेलची दरवाढ, भारनियमन, जीएसटी, महागाई या बाबत जनतेच्या रोषाला या सरकारला सामोरे जावे लागत आहे. आम्ही आता या दोन्ही सरकार विरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करणार आहोत.'', असेही मुंडे म्हणाले.

''सोशल मीडियावर जाहिरातबाजी करून हे सरकार सत्तेत आले, आता याच सोशल मीडियावरून त्यांच्यावर टीका होऊ नये म्हणून पैसे देऊन टीका दाबण्याचा प्रकार सुरू आहे. सरकार विरोधात आवाज उठविणाऱ्या ना नोटीसा दिल्या आहेत. हे निर्दयी आणि हुकूमशाही सरकार आहे. हे आम्ही आता सहन करणार नाही, नोटीसा दिलेल्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहणार आहे.'' असेही मुंडे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

दोन राजांचा वाद वैयक्तिक
टोलनाका प्रकरणी  साताऱ्यातील दोन राजांचा वाद हा वैयक्तिक असून त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी काहीही संबंध नाही, असे सांगत धनंजय मुंढे यांनी दोन महाराजांच्या टोलनाका वादाला बगल दिली. तर या वादावर शरद पवार साहेबच तोडगा काढतील, असे आमदार शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.

संबंधित लेख