लक्षवेधी प्रश्न विचारला म्हणून अधिकाऱ्याची धनंजय मुंडेंच्या कार्यालयात घुसून दमदाटी

विरोधी पक्ष नेत्याचे स्थान एक वेगळे आणि महत्वाचे असून अशा प्रकारे अधिकारी येऊन धमकी देत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही. सदरच्या प्रकरणाची दखल घेत अन्न व सुरक्षा अधिकारी आर.डी. आकरूपे यांना निलंबित करण्यात येत आहे.-गिरीश बापट
dhananjay_munde
dhananjay_munde

मुंबई  : राजरोसपणे राज्यात सर्वत्र बिनदिक्कतपणे विकण्यात येणाऱ्या गुटख्याची लक्षवेधी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी लावली होती. त्यामुळे आपल्याला चौकशीला सामोरे जावे लागेल, या रागाने  अन्न नागरी पुरवठा विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्याने विरोधी पक्ष नेत्यांच्या कार्यालयातच येवून राडा केला.

 एवढेच नाही भाजपाच्या एका आमदारासोबत येऊन मुंडे यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला धमकीही दिली. यासर्व प्रकाराचे पडसाद विधान परिषदेत उमटले. आक्रमक विरोधकांची मागणी लक्षात घेऊन अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी धमकी देणाऱ्या अन्न व सुरक्षा अधिकारी आर.डी. आकरूपे यांचे निलंबन करण्याची विधानपरिषदेत घोषणा केली.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या ओएसडीला धमकी देणाऱ्या आर.डी. आकरूपे  यांना तात्काळ निलंबीत करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात लावून धरली.  विधानमंडळात आपल्या कार्यालयात येऊन भाजपाच्या एका आमदाराने आणि  अन्न सुरक्षा अधिकाऱ्याने  येऊन माझ्या ओसीडीला धमकी दिली तर उद्या सदनात कोणत्याही प्रकारचा प्रश्न उपस्थित केला जाणार नाही. त्यात भाजपाच्या एका आमदारानेही अशा प्रकारे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आणि  आपण उपस्थित केलेल्या लक्षवेधीनंतर चौकशीच्या फेऱ्याच अडकणाऱ्या अधिकाऱ्याला घेऊन येणे आणि धमकी देणे हे गंभीर आहे. 

त्यामुळे  या प्रकरणी तात्काळ या अधिकाऱ्याचे निलंबन करावे अशी मागणी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेंनी केली.  गुटखा विक्री आणि त्याच्या उत्पादनाविषयी लक्षवेधी उपस्थित करून यात 1 हजार कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याची मी मांडली होती, त्यात भिवंडी आणि ठाणे विभागात हा प्रकार कसा होतो याची माहितीही सभागृहापुढे मांडली होती. त्यावर मंत्री गिरीश बापट यांनी आपल्या उत्तरात राज्यात सुरु असलेल्या गुटखा विक्रीवर कडक कारवाई करण्यासाठी याचा तपास हा  दक्षता पथकामार्फत करण्याचे स्पष्ट आश्वासन दिले होते. 

गुटखा विक्री करणाऱ्याविरोधात नॉन बेलेबल गुन्हा दाखल केला जावा यासाठी कायदा करू तसेच दक्षता पथकाच्या चौकशीने मुंडे यांचे समाधान झाले नाही तर सीआयडीमार्फत या  प्रकरणाची चौकशी करू असेही आश्वासन बापट यांनी दिले होते असेही मुंडे यांनी सांगितले. या सर्व प्रकारामुळे विरोधी पक्षांचे सदस्य आक्रमक झाले. त्यांच्या आक्रमक  भूमिकेमुळे दोन वेळा सभागृह अर्ध्या-अर्ध्या तासासाठी तहकूब करावे लागले.

 त्यानंतर  बोलण्यासाठी उभे राहिलेल्या संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट म्हणाले की, "सभागृहात विविध आयुधांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करणे हा विरोधीपक्ष नेत्यांचा आणि सदस्यांचा अधिकार आहे. त्यात विरोधी पक्ष नेत्याचे स्थान एक वेगळे आणि महत्वाचे असून अशा प्रकारे अधिकारी येऊन धमकी देत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही. सदरच्या प्रकरणाची दखल घेत  अन्न व सुरक्षा अधिकारी आर.डी. आकरूपे  यांना निलंबित करण्यात येत आहे ."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com