Government is trying to divide farmers - Ashok Chavan | Sarkarnama

शेतकऱ्यांच्या संपात फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न - अशोक चव्हाण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

मराठवाड्याची उपेक्षाच 
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर परळीला आले होते. त्यांच्याकडून मराठवाड्याला काही तरी मिळेल अशी अपेक्षा होती पण नेहमीप्रमाणे उपेक्षाच झाली. नांदेडहून अजूनही मुंबईला जाण्यासाठी विमानसेवा सुरू झाली नाही त्याचबरोबर नांदेडहून नागपूर, पुणे, मुंबईसाठी रेल्वेची घोषणा अपेक्षित होती ती देखील रेल्वेमंत्र्यांनी केली नाही. राजकीय कारणामुळेच नांदेड आणि मराठवाडा उपेक्षीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

नांदेड :  अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेऊन सरकार शेतकऱ्यांच्या संपात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांच्या संपाला कॉंग्रेसचा पाठिंबा असून त्यांच्या संपात सहभागी देखील होणार आहे.

 त्याचबरोबर राज्य सरकारचे अर्थिक नियोजन कोलमडले असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला . 

शेतकरी संपाच्या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्री. चव्हाण यांनी माहिती दिली. शेतकऱ्यांच्या संपाला वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप करून ते म्हणाले की, मागील तीन वर्षात राज्यातील परिस्थिती खराब असल्यामुळे शेतकऱ्यांना म्हणावे तसे उत्पन्न शेतीतून मिळाले नाही. 

त्यामुळे त्यांच्या हाल अपेष्टा वाढल्या तसेच घेतलेले कर्ज आणि त्यावरील व्याज यातून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मराठवाड्यातही नांदेड आणि बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सरकारने सरसकट सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी आमची मागणी आहे. 

सरकार शेतकऱ्यांच्याबाबतीत फक्त अभ्यास सुरू आहे असे सांगून वेळ मारून नेत आहे. गेल्या कित्येक महिन्यापासून सुरू असलेला त्यांचा अभ्यास काही संपत नाही आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळत नाही त्यामुळेच शेतकऱ्यांनीच शेतकऱ्यांच्या मागणीसाठी संप सुरू केला असून त्यास शेतकऱ्यांच्या विविध संघटनांसह कॉंग्रेस तसेच इतर पक्षांचाही पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. 

हमीभावाच्या संदर्भातही केंद्र सरकारचा निर्णयाचा विषय आहे. मात्र त्याबाबतही अंमलबजावणी नाही. मध्यंतरी डाळ नियंत्रक कायदा आणला त्याचीही अंमलबजावणी नाही. केंद्राचे मार्गदर्शन नाही. एकूणच राज्य सरकारचे अर्थिक नियोजन कोलमडले असून नको तिथे अफाट खर्च होत आहे.

 मंत्र्यांच्या विदेश दौऱ्यावर आणि त्यांच्या दालनावर खर्च करण्यासाठी लाखो रुपये त्यांच्याकडे आहेत आणि शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी पैसे नाहीत, असा आरोपही श्री. चव्हाण यांनी केला असून सरकारची जबाबदारी असताना देखील त्यातून पळवाट काढण्याचे उद्योग सुरू असल्याचेही ते म्हणाले. 

कर्जमाफीचा फायदा बॅंकांना होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे विधान हास्यापद असल्याचे सांगून श्री. चव्हाण म्हणाले की, बॅंकेकडून कर्ज घेतले तर परतफेड ही करावी लागते. सरकारने सावकारांकडून घेतलेले कर्ज माफ केले तर मग बॅंकांचे का नाही? 

 

त्याचबरोबर बॅंका टिकल्या तरच पुढे त्यांना कर्ज मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन जे जे करणे शक्य आहे ते सरकारने करावे. सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले नाही तर शेतकऱ्यांचे आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी कॉंग्रेसही सोबत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
 

संबंधित लेख