Government trying to distract from loan waiver | Sarkarnama

कर्जमाफीवरून लक्ष विचलित  करण्याचा प्रयत्न : विखे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

तूरखरेदीतील गोंधळातूनच सरकारचे अपयश दिसले. कृषी-पणन विभागांमध्ये समन्वय नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. चुकीची, दिशाभूल करणारी माहिती देणाऱ्या मंत्र्यांची हकालपट्टी करावी.

शिर्डी : "शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेमुळे राज्य सरकारची अब्रू चव्हाट्यावर आली. आता मुख्यमंत्री संवाद यात्रा काढून कर्जमाफीवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल,'' असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिला. 

पत्रकारांशी बोलताना विखे म्हणाले, "सरकारमध्ये सहभागी असलेल्या पक्षांमध्येच संवाद नाही. ते जनतेत जाऊन कोणता संवाद साधणार? कर्जमाफीच्या प्रश्‍नावरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. तीन वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्याला सरकारने काहीच दिलासा दिलेला नाही. निवडणुकीतील आश्‍वासने खोटी ठरली. सात-बारा उतारा कोरा करू म्हणणाऱ्या सरकारची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. त्याला मुलामा देण्याचा प्रयत्न म्हणून संवाद यात्रा काढली जात आहे.'' 

ते पुढे म्हणाले, "तूरखरेदीतील गोंधळातूनच सरकारचे अपयश दिसले. कृषी-पणन विभागांमध्ये समन्वय नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. चुकीची, दिशाभूल करणारी माहिती देणाऱ्या मंत्र्यांची हकालपट्टी करावी. तुरीला जाहीर केलेला भाव आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मिळणाऱ्या पैशात तफावत आहे. तफावतीची रक्कम सरकारने शेतकऱ्यांना बोनस म्हणून द्यावी.'' 

संबंधित लेख