Government must declare drought in all Maharashtra : Sharad Pawar | Sarkarnama

एकही तालुका न वगळता दुष्काळ जाहीर करा   : शरद पवार 

अरुण जैन
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

श्री. बोंद्रे यांनी जिल्ह्यात पाणी आणले. उद्योग आणि शेतीला चांगले दिवस आणण्यासाठी प्रयत्न केले .

- शरद पवार

बुलडाणा :" दुष्काळाची परिस्थिती सगळीकडे असल्याने एकही तालुका न वगळता दुष्काळ जाहीर करा, अशी आपली मागणी आहे. सन्मानाने जगणे अशक्य झाल्यामुळेच शेतकरी आत्महत्या करतो. त्याच्या आत्महत्येचे राजकारण करू नका", असा खणखणीत इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज चिखली येथे दिला.

श्री. पवार यांचे त्या काळचे मंत्रीमंडळातील सहकारी भारत बोंद्रे यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार राहुल बोंद्रे, डॉ. संजय रायमूलकर, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, बाबूराव पाटील, विजयराज शिंदे, वसंतराव शिंदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी, संगीतराव भोंगळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळी यावेळी उपस्थित होती.

 यावेळी भारत बोंद्रे यांचे वडील राजाभाऊ बोंद्रे व भारतभाऊंनी त्यांच्या मंत्रीपदाच्या काळात केलेल्या कामाचा आढावा शरद पवार  घेतला. श्री. बोंद्रे यांनी कुटुंबाच्या विकासाचा विचार न करता जिल्ह्यात पाणी आणले. उद्योग आणि शेतीला चांगले दिवस आणण्यासाठी प्रयत्न केले, असेही ते म्हणाले  
 
श्री. पवार पुढे म्हणाले की, " देशातील भ्रष्टाचार उघडकीस आणून सामान्य माणसाला दिलासा देणारी संस्था म्हणजे सीबीआय होय. मात्र आज या संस्थेतील सर्वोच्च अधिकारी एकमेकांचे कट्टर शत्रू बनले आहेत. याचे परिणाम सर्वसामान्य जनतेवर होत आहेत. अशा संकटाच्या काळात एकत्र राहून लोकांच्या आणि समाजाच्या विकासाची जाण ठेवली पाहिजे. " 

 

संबंधित लेख