The government has gone crazy, says MP Ashokrao Chavan | Sarkarnama

सरकारच पागल झाले आहे; कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची टीका

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. एखाद्याची मनःस्थिती खराब झाली तर त्याला मानसोपचार तज्ज्ञांची गरज भासते. सध्या सरकारच पागल झाले असल्याने खरी उपचाराची गरज भाजप-शिवसेना सरकारला असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी केला. 

अकोला : शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. एखाद्याची मनःस्थिती खराब झाली तर त्याला मानसोपचार तज्ज्ञांची गरज भासते. सध्या सरकारच पागल झाले असल्याने खरी उपचाराची गरज भाजप-शिवसेना सरकारला असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी केला. 

काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्यात शुक्रवारी अकोला येथे जाहीर सभा झाली. स्वराज्य भवनाच्या मैदानावर झालेल्या या सभेच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना खासदार चव्हाण यांनी भाजपला रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष लोकांना एकत्र आले पाहिजे, असे आवाहन केले. त्यासाठी राज्यात सर्व समविचारी धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत महाआघाडी करण्याच प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

संघर्ष यात्रेच्या निमित्ताने राज्य व केंद्रातील सरकारचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणून जनतेपुढे मांडला असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप सरकारच्या काळात देशातील कोणताच घटक समाधानी नाही. आश्‍वासनांची पूर्तता नाही. शेतकरी, तरूण देशोधडीला लागले आहेत. भाजपचे मंत्री बेताल वक्तव्य करीत आहे. 

दुष्काळात पशूधन वाचविण्यासाठी चारा छावण्या सुरू करण्याएेवजी जनावर पावण्याच्या घरी बांधण्याचा सल्ला भाजपचे मंत्री देत आहे. एखाद्याची मनःस्थिती बिघडली की, त्याला मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचाराची गरज भासते. राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर आत्महत्येच्या विचारात असलेल्या शेतकऱ्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन देण्याचा आदेश सरकारने काढला होता. विद्यमान सरकारच सध्या पागल झाले आहे. त्यामुळे खरी उपचाराची गरज सरकारला असल्याचे खासदार चव्हाण म्हणाले. 

काँग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या चांगल्या कामांबाबत बोलताना काँग्रेस आघाडीचे सरकार हे संविधानावर चालणारे सरकार होते, असे त्यांनी सांगितले. या सभेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सचिन सावंत, माजी आमदार आशीष देशमुख, माजी मंत्री वसंतराव पुरके, अकोला जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, महानराध्यक्ष बबनराव चाैधरी, माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, रामदास बोडखे, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे आदींसह स्थानिक नेते,पदाधिकारी व नगरसेवकांची उपस्थिती होती. संचालन श्‍याम उमाळकर, कपिल रावदेव यांनी केले तर आभार मदन भरगड यांनी मानले. 

प्रकाश आंबेडकरांशी बोलणी; एमआयएम नकोच!
राज्यात धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी करण्याच प्रयत्नात आहे. त्यासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत बोलणी सुरू आहे. मात्र, महाआघाडीत एमआयएमला स्थान राहणार नाही, असे खासदार अशोक चव्हाण यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. एमआयएम ही भाजपची ‘बी’ टीम आहे. मतविभाजनाचा फायदा फक्त भाजपला झाला. त्यामुळे मतविभाजन टाळण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. 

एक चव्हाण आले, दुसरे निघून गेले!
अकोला येथे संघर्ष यात्रेची जाहीर सभा सुरू असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष घाईघाईत कार्यक्रमाला आले. ते जाहीर सभेचे अध्यक्ष होते. मात्र, ताडतीने नांदेडला परत जावयाचे असल्याने त्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच अध्यक्षीय भाषण केले. भाषण आटोपताच ते निघून गेले. खासदार अशोकराव चव्हाण निघून जाताच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कार्यक्रम स्थळी पोहचले. कार्यक्रम सुरू झाला त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या आदिवांसींना भेटण्यासाठी गेले होते. ते परत येईपर्यंत खासदार अशोकराव चव्हाण भाषण आटोपून विमानतळाकडे निघून गेले.

संबंधित लेख