Government has Done lots of things for Maratha Community | Sarkarnama

मराठा समाजासाठी सरकारने केलेल्या कामांमुळे विरोधक घाबरले : चंद्रकांत पाटील 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

राज्यात 1980 पासून आरक्षणाची हा लढा तीव्र झाला. अण्णासाहेब पाटील यांनी पहिल्यांदा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढला. या मागणीसाठी आत्महत्या केली. सध्या आरक्षण मुद्दा कोर्टात आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर विशेष अधिवेशन बोलवणार आहोत - चंद्रकांत पाटील

नाशिक : "मराठा समाजाला सरकारकडून आरक्षण मिळेलच. मात्र आरक्षण मिळूनही नोकऱ्या, स्वयंरोजगारासाठी दहा लाखांच्या कर्जाची हमी दिली. राज्य सरकारने मराठा समाजासाठी मोठे काम केले आहे. त्यामुळे विरोधक घाबरले आहेत. असेच सुरु राहिले तर लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आमचे काय होईल त्याची त्यांना धास्ती आहे. भाजप मात्र मतांसाठी यातील काहीही करीत नाही," असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले.

मराठा समाजाच्या युवकांसाठी बांधण्यात आलेल्या पंजाबराव देशमुख वसतिगृहाचे उद्‌घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले, ''मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण आम्ही देणार आहोत. याशिवाय राज्यातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोफत राहण्याची सोय व्हावी म्हणून वसतीगृह बांधण्याचा निर्णय झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मागणारे विनायक मेटे हे जुने नेते आहेत. अनेक वर्षांपासून ते त्यासाठी प्रयत्न करत आहेत. आरक्षणाची चळवळ 1968 पासून आहे. तेव्हापासून मराठा समाजाची ही मागणी आहे."

ते पुढे म्हणाले, "राज्यात 1980 पासून आरक्षणाची हा लढा तीव्र झाला. अण्णासाहेब पाटील यांनी पहिल्यांदा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढला. या मागणीसाठी आत्महत्या केली. सध्या आरक्षण मुद्दा कोर्टात आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर विशेष अधिवेशन बोलवणार आहोत.'' येत्या 15 नोव्हेंबर अखेर मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य शासनाला प्राप्त होईल, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महापौर रंजना भानसी, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार विनायक मेटे आदी उपस्थित होते. 

संबंधित लेख