gore brothers challenges two congress | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

दोन गोरेंकडून दोन्ही कॉंग्रेसला आव्हान! 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 24 जुलै 2017

जयकुमार गोरे व शेखर गोरे हे दोघे सख्खे भाऊ आहेत. दोघेही आक्रमक आहेत. पुर्वी ते कॉंग्रेसमध्ये एकत्र होते, मात्र विधानसभेला वेगळे झाले. जयकुमार गोरे कॉंग्रेसकडून लढले तर शेखर गोरे महायुतीकडून. जयकुमार जिंकले आणि शेखर दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यावेळपासून दोघांतील संघर्ष बळावला आहे. शेखर काही महिन्यांपुर्वी राष्ट्रवादीत गेले आहेत. कॉंग्रेसच्या प्रस्थापित नेत्यांना जयकुमार यांच्याकडून तर राष्ट्रवादीवाल्यांना शेखर यांच्याकडून अडचणी वाटतात. 

सातारा : पक्षात आपले अस्तित्व दाखविण्यासोबतच जिल्ह्याच्या राजकारणावर आपली पक्कड राहावी, या दृष्टीने माण-खटावचे कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे यांच्याकडून दोन्ही कॉंग्रेस टार्गेट होत आहेत. त्यामुळे एकीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तर दुसरीकडे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यापुढील अडचणी वाढू लागल्या आहेत. 

कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावरून माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी विद्यमान जिल्हाध्यक्ष, आमदार आनंदराव पाटील यांच्याविरोधात भुमिका घेतली आहे. आनंदराव पाटील हे पृथ्वीराज चव्हाणांचे अत्यंत विश्‍वासू आहेत. त्यामुळे आनंदरावांच्या नावाने होत असलेला विरोध पुढे जावून त्याचा त्रास पृथ्वीराजबाबांना होऊ शकतो. जयकुमार गोरे हे पृथ्वीराज चव्हाणांचे समर्थक आहेत. अशा परिस्थिती गोरेंनी घेतलेल्या भुमिकेमुळे पृथ्वीराज चव्हाण यांना सावध भूमिका घ्यावी लागली आहे. गोरे- पाटील यांच्यातील वादामुळे पृथ्वीराज चव्हाणा यांनी तिसराच नवीन चेहरा आणण्याची तयारी केली आहे. आता हा नवीन चेहरा कोण याची उत्सुकता कॉंग्रेसच्या सर्वांनाच आहे. पण आमदार गोरेंच्या भुमिकेमुळे कॉंग्रेस पक्ष आणि पृथ्वीराज चव्हाणांपुढे अडचण निर्माण झाली आहे. मुळात जिल्हाध्यक्षपदासाठी 120 मतदार मतदान करू शकणार आहेत. ते सर्व मतदार आनंदराव पाटील यांच्या बाजूचे आहेत, त्यामुळे गोरेंनी घेतलेली भुमिका तडीस जाणे सोपे नाही. पण गोरेंच्या विरोधामुळे आनंदराव पाटील यांचा पुर्ण घामटा निघाला आहे. बैठकीनिमित्त गोरे आणि आनंदराव हे कॉंग्रेस कमिटीत एकत्रित आले होते, मात्र ते एकमेकांकडे खुन्नस असल्यागत पाहत होते. त्यावरुन कॉंग्रेसमधील तणाव किती टोकाला गेला आहे, हे स्पष्ट होते. 

दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात असलेले दुसरे माणचे नेते शेखर गोरे यांनी बंडाची भुमिका घेत राष्ट्रवादीचे नेते, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकरांवर थेट आरोप केले आहेत. जिल्ह्यातील पक्ष नेतृत्व आपल्याला विचारात घेत नाहीत, माण-खटावची जबाबदारी असूनही येथील सर्व निवडीत रामराजेंचा हस्तक्षेप वाढला आहे. तसेच जिल्हा बॅंकेवर संचालक म्हणून घेण्याबाबत ही विलंब लावण्यात आला आहे. या बाबींवर बोट ठेवत शेखर गोरेंनी थेट अजित पवारांपुढे आपली कैफियत मांडली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील रामराजेंच्या एकाधिकारशाहीविरोधात शेखर गोरेंनी पुकारलेले हे बंड राष्ट्रवादीतील नेत्यांची डोकेदुखी झाली आहे. 
शेखर गोरेंची समजूत काढली जाईल, त्यांच्या मागण्या मान्य होतीलही. पण त्यांचे हे बंड आगामी काळात राष्ट्रवादीलाही अडचणीचे ठरणार याची काळजी पक्षातील नेत्यांना घ्यावी लागणार आहे. एकुणच माण तालुक्‍यातील गोरेबंधूंनी दोन्ही कॉंग्रेस पक्षांना विविध मुद्‌द्‌यांवरून टार्गेट केले आहे. यातून दोन दिग्गज नेत्यांपुढील अडचणी वाढल्या आहेत. गोरे बंधूंना न दुखावता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर कसा मार्ग काढणार याचीच उत्सुकता आहे. 

 

संबंधित लेख