gopichand padalkar criticise mp sanjay patil | Sarkarnama

शिवाजीराव नाईक, सुरेश खाडेंना संजयकाकांनी मंत्रीपद मिळू दिले नाही!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

"पाणी सोडण्यासाठी राजीनामा देण्याची वेळ येते हे कसले नेते,' अशा शब्दांत खासदार संजय पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

सांगली : जिल्ह्यात भाजपचा एकही नेता लायकीचा नाही. माझा भाजपशी काही संबंध नाही. जिल्ह्यातील नेत्यांच्या विरोधामुळेच सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक यांना मंत्रीपद मिळाले नाही, अशा शब्दांत भाजपा युवा मोर्चाच्या ग्रामीण विभागाचे जिल्हाध्यक्ष गोपीचंद पडळकर यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे, मात्र पक्ष सोडला का या प्रश्‍नावर त्यांनी योग्यवेळी बोलू असे म्हटले आहे. 

"पाणी सोडण्यासाठी राजीनामा देण्याची वेळ येते हे कसले नेते,' अशा शब्दांत खासदार संजय पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. यानिमित्ताने पडळकर यांनी गेल्या काही महिन्यांपासून पक्षात होत असलेल्या घुसमटीला वाट मोकळी करुन दिली.

भाजपमध्ये ते विनोद तावडे यांचे समर्थक मानले जातात. आटपाडी तालुक्‍यात त्यांनी स्वतंत्र स्थान तयार केले आहे. आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र देशमुखही भाजपमध्ये दाखल झाले. कॉंग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि भाजपचे खासदार संजय पाटील यांचा दोस्ताना जगजाहीर आहे. त्यामुळे पडळकर आता एकाकी पडले आहेत.

आज त्यांनी पत्रकार परिषद घेताना भाजप नेत्यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, " माझी कसलीही घुसमट होत नाही. मुळात मी जिल्ह्यातील कुणाला माझा नेताच मानत नाही. जिल्ह्यात भाजपमध्ये एकही त्या लायकीचा नेता नाही. माझे घर उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी आपले स्वत:चे घर सांभाळावे.  आजवर मी संघर्षच केला आहे. यापुढेही लढत राहणार आहे.''

ते म्हणाले,"" आमदार सुरेश खाडे आणि आमदार शिवाजीराव नाईक यांचे मंत्रीपद कुणामुळे गेले? त्यांच्या मंत्रीपदाचा जिल्ह्यातील नेत्यांनीच विरोध केला. त्यामुळे जिल्ह्याला एकही मंत्रीपद मिळू शकले नाही. आर. आर. पाटील, पतंगराव कदम आणि जयंत पाटील हे तिघे जिल्ह्याचे मंत्री होते. ते सांगलीत बसून राज्याचे निर्णय घेत होते. मात्र आज भाजपच्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दोन दोन तास वाट पहात बाहेर बसावे लागते.'' 

संबंधित लेख