ऊस उत्पादकांसाठी मोदींची खूषखबर : इथेनॉलच्या दरात केंद्राकडून घसघशीत 30 टक्के दरवाढ

ऊस उत्पादकांसाठी मोदींची खूषखबर : इथेनॉलच्या दरात केंद्राकडून घसघशीत 30 टक्के दरवाढ

भवानीनगर : पेट्रोल, डिझेलच्या गगनाला भिडलेल्या भावावर "स्वदेशी' तडका म्हणून जुलै महिन्यात केंद्र सरकारने उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीला परवानगी दिल्यानंतर आज (ता. 12) इथेनॉलच्या दरात घसघशीत वाढ करीत ऊस उत्पादकांना खूश केले आहे.

उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर प्रतिलिटर 47.50 रुपयांवरून थेट 59.50 रुपयांवर नेऊन ठेवला असून साखर उद्योगासाठी आता "सनराईज इंडस्ट्री" चे स्वप्न साकारले आहे. 

आज सकाळी हा निर्णय मंत्रीसमितीने जाहीर केला. वास्तविक पाहता गेल्या चार दिवसांपासून या निर्णयाकडे साखर उद्योगाचे डोळे लागून राहिले होते. अपेक्षेपेक्षाही केंद्राने दरवाढ करून साखर उद्योगांना खूष केले आहे. याचा पर्यायाने फायदा ऊस उत्पादकांना मिळणार आहे.

गेल्या काही दिवसांत पेट्रोलियम पदार्थाने वाढलेल्या दराने केंद्र सरकारला टिकेचा भडीमार सहन करावा लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे.

साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास दीड महिन्यापूर्वी सरकारने परवानगी दिली होती. विक्रमी साखर उत्पादन हेही त्यामागचे एक कारण होते. यासंदर्भात सरकारने 26 जुलै 2018 रोजी निर्णय जाहीर केला होता. एक टन साखर म्हणजे 600 लिटर इथेनॉल ही तुलना करीत बहुतांश साखर ही इथेनॉलकडे वळाल्यास देशातील साखर व इंधनाच्या मागणी-पुरवठ्याचे संतुलन साधण्याचा एक प्रयत्न या निर्णयातून केंद्र सरकारने केला आहे. 

एकंदरीत ब्राझीलच्या धर्तीवर आता देशातील साखर कारखाने सोईनुसार साखर व इथेनॉल निर्मितीचे पर्याय स्वीकारतील. आता इथेनॉलचे दर वाढीव ठेवल्याने कारखान्यांनाही इथेनॉलवर भर देणे सहजशक्‍य होणार आहे. येणाऱ्या हंगामात देशात 330 लाख टनांहून अधिक साखर उत्पादनाचा अंदाज असून साखरेऐवजी सध्या पुरवठ्यापेक्षा वाढलेली इथेनॉलची 150 कोटी लिटरची गरज भागविण्याची बेरीज केंद्राने साधली आहे. पेट्रोलियम कंपन्या व मंत्रालयाचे सहकार्य यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. 

आकडे काय सांगतात?

यावर्षी देशातील संभाव्य साखर उत्पादन - 350-355 लाख टन 
यावर्षी गाळपासाठी उसाचे क्षेत्र 11.42 लाख हेक्‍टर. 
देशातील साखर कारखाने 562 
आसवनी निर्मिती करणारे कारखाने -150 
देशातील इथेनॉलची मागणी 313 कोटी लिटर 
देशातील सध्या साखर कारखान्यांची उत्पादनाची क्षमता - 165 कोटी लिटर 
आतापर्यंतचा थेट इथेनॉल खरेदीचा दर प्रतिलिटर 47.50 रुपये 
आजपासून थेट इथेनॉलचा दर प्रतिलिटर 59.50 रुपये 
आधीचा बी हेवी इथेनॉलचा दर प्रतिलिटर 47.50 रुपये 
आधीचा बी हेवी इथेनॉलचा दर प्रतिलिटर 52.42 रुपये 
----- 

फायदा काय होणार? 

पेट्रोल- डिझेलमध्ये 10 टक्‍क्‍यांपर्यंत इथेनॉल मिसळण्याची परवानगी आहे. सद्यस्थितीत केवळ 2 टक्‍क्‍यांपर्यंत मिसळले जाते, मात्र भरीव दरामुळे आता कारखाने मोठ्या संख्येने इथेनॉल निर्मितीत उतरतील. साखर उत्पादनाच्या विक्रमी आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर इथेनॉल निर्मितीकडे ऊस वळविल्यास साखर उत्पादनही वाजवी राखण्यात व बाजारभाव योग्य राखण्यास मदत होणार. एक टन उसापासून 75 ते 80 लिटर इथेनॉल उत्पादन, त्यामुळे सध्याच्या आकडेवारीनुसार एका टन उसापासून कारखान्यांना 4500 ते 4600 रुपये मिळणार. प्रक्रिया खर्चाचे 1 हजार ते 1100 रुपये वगळले तर 3400 ते 3500 रुपये ऊस उत्पादकांसाठी मिळू शकतात. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com