गोकुळ : महाडिकांनी लावले गौरवशाली परंपरेला गालबोट ! 

अधिकार नसताना माजी आमदार महादेवराव महाडीक यांनी आज झालेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभेत अहवालातील विषयपत्रिकेवरील एकही विषय न वाचता मंजूर मंजूर म्हणत सभा गुंडाळून संघाच्या 55 वर्षाच्या वैभवशाली परंपरेलाच गालबोट लावले. श्री. महाडीक यांच्या या वर्तणुकीने संघाच्या ज्येष्ठ संचालकांसह अधिकारी, कर्मचारी व उपस्थित सभासदांनाही धक्का बसला.
 गोकुळ : महाडिकांनी लावले गौरवशाली परंपरेला गालबोट ! 
गोकुळ : महाडिकांनी लावले गौरवशाली परंपरेला गालबोट ! 

कोल्हापूर : अधिकार नसताना माजी आमदार महादेवराव महाडीक यांनी आज झालेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभेत अहवालातील विषयपत्रिकेवरील एकही विषय न वाचता मंजूर मंजूर म्हणत सभा गुंडाळून संघाच्या 55 वर्षाच्या वैभवशाली परंपरेलाच गालबोट लावले. श्री. महाडीक यांच्या या वर्तणुकीने संघाच्या ज्येष्ठ संचालकांसह अधिकारी, कर्मचारी व उपस्थित सभासदांनाही धक्का बसला. 

संघाच्या संचालकांचे नेतृत्त्व श्री. महाडीक यांच्यासह पी. एन. पाटील करतात. पुर्वी यात आमदार सतेज पाटील यांचाही समावेश होता. पण श्री. महाडीक यांच्याशी मतभेद निर्माण झाल्याने ते बाहेर पडले. तेव्हापासून ते संघाच्या कारभारावर टीका करत आहेत. गेल्यावर्षीच्या सभेला उपस्थित राहून श्री. पाटील यांनी संचालकांना धारेवर धरले. यावेळी त्यांनी 34 प्रश्‍न संघाच्या अर्थिक गैरव्यवस्थापनावर विचारले होते, पण ते आले नाहीत. गेल्यावेळी सभेला हजर राहून जे त्यांनी मिळवले नाही ते यावेळी न येता महाडीक यांच्या कृतीने त्यांनीच बाजी मारली. 

महाडीक-पी.एन. हे संघाचे गेल्या 20-22 वर्षापासून नेतृत्त्व करतात. पण संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यासपाठीवर हे दोघेही कधी बसत नव्हते. सभेदिवशी संघातर्फे आयोजित प्रदर्शनाचे उद्‌घाटन करून ते बाहेर पडत होते. पण आजची सभा त्याला अपवाद ठरली. सभा सुरू झाल्यानंतर या दोघांना व्यासपीठावर बघूनच सभासद, कर्मचारी अधिकारी अवाक्‌ झाले.या सभेत ते बोलणार नाहीत असे वाटत असतानाच इतर सर्वांची भाषणे व आभार प्रदर्शन रद्द करून या दोघांना बोलण्याची संधी दिली. महाडीक यांनी भाषण संपत असतानाच अहवालाचे विषय पत्रिकेचे पान उघडून सर्व विषय मंजूर का ? अशी विचारणा केली आणि सभा गुंडाळण्यात आली. 

सहकारी संस्था मग ती कोणतीही असो त्यांच्या वार्षिक सभा म्हणजे सभासदांसाठी हक्काचे व्यासपीठ. त्यात "गोकुळ' ची सभा म्हणजे संस्था प्रतिनिधींच्या अडचणी संचालकांपर्यत पोहचण्याचे एक माध्यम. यापुर्वी कै. आनंदराव पाटील-चुयेकर असो किंवा अरूण नरके हे अध्यक्ष असताना सभेला उपस्थित प्रत्येकाच्या भावना ऐकून घेतल्या जात होत्या. चुकले असेल तर त्यात दुरूस्तीचे आश्‍वासन यापुर्वी दिले जायचे. गेल्यावर्षीही सभेला आमदार सतेज पाटील उपस्थित होते, त्यांनी प्रश्‍नांचा भडीमार केला, त्याला प्रत्युत्तर देताना अध्यक्ष विश्‍वास पाटील यांची दमछाक झाली. पण श्री. नरके यांनी उठून माईकचा ताबा घेतला आणि किल्ला लढवला. पण यावेळी तसे काही घडलेच नाही. आपल्या भाषणात "गोकुळ' च्या वैभवशाली कामगिरीचे तोंड भरून कौतुक करणाऱ्या श्री. श्री. महाडीक यांनीच अनपेक्षितपणे अहवाल वाचन करून विषय मंजुरीचा नारा देऊन सर्वांना धक्काच दिला. 
वार्षिक सर्वसाधारण सभेत अहवाल वाचन करण्याचा अधिकार सहकार कायद्यानुसार सचिव यांना आहे. अहवाल वाचनाबरोबरच इतिवृत्त लिहण्याचे कामही तेच करतात. श्री. महाडीक हे संघाचे संचालकही नाहीत, ते कर्मचारी असण्याचाही संबंध नाही. पण बहुमताच्या जोरावर त्यांनी स्वतःच या सर्व भुमिका वठवून संघाच्या परंपरेला गालबोट लावले. राजाराम साखर कारखान्यात गेल्यावर्षी जे घडले तोच इतिहास "गोकुळ' मध्ये यावर्षी पहायला मिळाला. 

पत्रकारांवरही घसरले 
संघाच्या सभेचे वृत्तांकन करण्यासाठीच पत्रकारांची गर्दी नेहमीच असते. श्री. महाडीक हे या सभेला पहिल्यांदा उपस्थित राहील्याने त्यांना याची माहिती नव्हती. त्यात गेल्या सभेच्या तणावाच्या पार्श्‍वभुमीवर पत्रकार मोठ्या संख्यने होते. त्यामुळे श्री. महाडीक यांनी पत्रकारांनाही आपल्या टीकेच लक्ष्य करताना "विरोधकांनी पाठवलेले पत्रकार' अशी त्यांची संभवना केली. त्यांच्या या वक्‍तव्यावहरही पत्रकारांत नाराजी होती. 

संचालकांचे तोंडावर बोट 
या घडलेल्या प्रकाराबाबत बहुंताशी ज्येष्ठ संचालकांशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. गेल्यावेळच्या सभेत भावनाविवश होऊन संघ वाचवण्याची भाषा करणारे अरूण नरके यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला. एका संचालकांनी मात्र हा प्रकार म्हणजे संघाच्या वैभवशाली परंपरेला काळीमा फासणारी घटना असल्याचे सांगितले. एका संचालकांनी तर विरोधक सोडाच आमची माणसे आम्हाला शिव्या घालून गेली असे नांव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com