gokul politics | Sarkarnama

"गोकूळ' संचालकांवर भाजप प्रवेशासाठी दबाव 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 18 एप्रिल 2017

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघावर (गोकूळ) माजी आमदार महादेवराव महाडीक यांची एकहाती सत्ता
आहे. या सत्तेच्या माध्यमातूनच त्यांचे नेतृत्व मानणाऱ्या संचालकांना भारतीय जनता पार्टीत प्रवेशासाठी दबाव टाकला जात आहे.

कोल्हापूर : जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघावर (गोकूळ) माजी आमदार महादेवराव महाडीक यांची एकहाती सत्ता आहे. या सत्तेच्या माध्यमातूनच त्यांचे नेतृत्व मानणाऱ्या संचालकांना भारतीय जनता पार्टीत प्रवेशासाठी दबाव टाकला जात आहे. यापूर्वी ज्येष्ठ संचालक रणजितसिंह
पाटील यांना भाजपत घेण्याची खेळी यशस्वी झाल्यानंतर आता इतरांसाठी हेच तंत्र वापरले जात आहे. 

विधानसभेची उमेदवारी नको पण पाच वर्षे "गोकूळ' चे संचालक करावे यासाठी नेते व त्यांचे नातेवाईक प्रयत्नशील असतात. त्यामुळे सलग 35 ते 40 वर्षे काही ठराविक चेहरेच संचालक मंडळात आहेत. दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची सोय म्हणून या संस्थेकडे बघितले जाते पण हे कार्यकर्ते अजूनही नेत्यांच्या नावे घोषणा देण्यापुरतेच शिल्लक आहेत. संचालक पदावर नेते किंवा त्यांची मुले यांनाच प्राधान्य दिले जाते.  संघावर श्री. महाडीक व कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे वर्चस्व आहे. पण श्री. महाडीक यांना मानणाऱ्या संचालकांची संख्या मोठी आहे. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीत श्री. महाडीक यांनी पी. एन. यांच्याविरोधात भूमिका घेत कॉंग्रेसकडून सत्ता हिसकावून घेतली. पण तरीही "गोकूळ' च्या राजकारणात या दोघांचे संबंध बिघडण्याची शक्‍यता नाही. यामागेही आर्थिक गणित हेच कारण आहे. नेमक्‍या या सत्तेचा वापर करून काही संचालकांना भाजप प्रवेशासाठी दबाव टाकला जात आहे. 

ज्येष्ठ संचालक रणजितसिंह पाटील यांच्यानंतर आता संचालक धैर्यशील देसाई यांचे बंधू व माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई यांना भाजपत येण्याची सक्ती केली जात आहे. श्री. देसाई यांच्या पत्नी सौ. रश्‍मी ह्या कॉंग्रेसच्या चिन्हावर जिल्हा परिषदेत विजयी झाल्या. पण याच सत्तेचा वापर करून श्री. महाडीक यांनी त्यांना पदाधिकारी निवडीत गैरहजर राहण्यास भाग पाडले. "गोकूळ' महत्त्वाचे की जिल्हा परिषद ते बघा असे सांगत हा दबाव टाकण्यात आला. श्री. देसाई यांच्या पाठोपाठ रवींद्र आपटे, विश्‍वास जाधव यांना भाजपचा "स्कार्प' गळ्यात घालायला लावले जाण्याची शक्‍यता आहे. 

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत "गोकूळ' चे श्री. महाडीक यांना मानणारे बहुंताशी संचालक उघडपणे भाजपच्या प्रचारात होते. सत्ता स्थापनेतही या संचालकांनी भाजपसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. "सत्तेपुढे शहाणपण चालत नाही' या म्हणीप्रमाणे इच्छा नसतानाही अनेक संचालकांना हा मार्ग स्वीकारावा
लागत आहे. 
 

संबंधित लेख