Gokul meeting over in 3 minutes | Sarkarnama

गोकुळ सभा तीन मिनीटात गुंडाळली 

सदानंद पाटील 
रविवार, 30 सप्टेंबर 2018

जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिलेली गोकूळ दूध संघाची सर्वसाधरण सभा सत्ताधारी-विरोधक आमने-सामने भिडल्याने अवघ्या तीन मिनिटात गुंडळण्यात आली.

कोल्हापूर  : जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिलेली गोकूळ दूध संघाची सर्वसाधरण सभा सत्ताधारी-विरोधक आमने-सामने भिडल्याने अवघ्या तीन मिनिटात गुंडळण्यात आली.

सत्ताधारी व विरोधी गटाच्या प्रचंड घोषणाबाजीत ही सभा संपवण्यात आली. लोकशाही पध्दतीने ही सभा होवून मल्टीस्टेटचा ठराव मंजूर झाल्याचे महाडिक यांनी जाहीर केले. तर प्रचंड बहुमताने मल्टीस्टेटचा ठराव ना मंजूर झाल्याचे विरोधी आघाडीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील व आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले. 

गोकुळची आज सर्वसाधारण सभा ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या आवारात आयोजित केली होती. मल्टीस्टेटचा ठराव येणार असल्याने ही सभा पहिल्यापासूनच वादळी होणार याचा अंदाज सर्व जिल्ह्याला होता. त्याचपध्दतीने आजची ही सभा पार पडली. पहाटेपासूनच सत्ताधाऱ्यांनी ठरावधारकांना सभास्थळी आणून मोठी जागा व्यापली होती.

विरोधक येईपर्यंत सभागृहाचा 70 टक्‍के भाग व्यापलाने विरोधकांना बसण्यासाठी सभागृहाच्या शेवटी जागा ठेवण्यात आली होती. त्यामुळे पुढे जागा देण्याची मागणी करत विरोधकांनी प्रवेशदवार आडवून ठेवले होते.

मात्र जागा उपलब्ध होत नसल्याने 10 वाजून 50 मिनिटांनी विरोधक सभागृहात आले. विरोधी गटाचे नेते आमदार हसन मुश्रीफ व आमदार चंद्रदीप नरके यांनी थेट स्टेजकडेच कूच केल्याने सत्ताधाऱ्यांची गडबड सुरु झाली. सभासद, नेते अशा सर्वांचाच दंगा सुरु झाला. 

विरोधक आक्रमक झाल्याचे पाहून चेअरमननी ठराव नंबर एक असे म्हंटल्यानंतर समर्थकांकडून मंजूर तर विरोधकांकडून नामंजूर अशा घोषणा देण्यात आल्या. अशाच पध्दतीने ठराव क्रमांक दोन, तीन करत ठराव क्रमांक 12 संघ मल्टीस्टेट करण्याचा ठरावही असाच उच्चारण्यात आला. त्याला सत्ताधाऱ्यांनी समर्थन तर विरोधकांनी विरोध दर्शवला. हा सर्व प्रकार तीन मिनीटात घडला आणि राष्ट्रगीत म्हणून ही सभा गुंडाळण्यात आली. 
 

संबंधित लेख