उपराष्ट्रपतींच्या कार्यक्रमात गोगावलेंना डावलले?

उपराष्ट्रपतींच्या कार्यक्रमात गोगावलेंना डावलले?

पुणे : महापालिकेच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेले भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांना उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात डावल्याची चर्चा भाजपच्या वर्तुळात आहे.

या कार्यक्रमात "दादां'चा अर्थात, गोगावल यांचा योग्य तो "पाहुणचार' झाला नसल्याचा पक्षाच्या काही उत्साही नगरसेवकांचा सूर आहे. गोगावलेंना जाणीवपूर्वक लांब ठेवल्याचा त्यांचा आक्षेप असल्याची चर्चा पक्षात आहे. महापालिकेच्या कार्यक्रमात "राजशिष्टाचार' पाळणे महत्त्वाचे असल्याचे पक्षाच्या एका गटाने स्पष्ट केले. त्यामुळे "दादां'च्या उपस्थितीवरून पक्षातर्गंत मानापमानाचे नाट्य रंगण्याची शक्‍यता आहे. 

महापालिकेच्या नव्या इमारतीचे उदघाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरूवारी झाले. त्यासाठी गोगावलेही उपस्थित होते. सभागृहातील आसन व्यवस्थेच्या पहिल्या काही रांगा सर्वपक्षीय नगरसेवकांसाठी आरक्षित होत्या. त्यानंतर निमंत्रितांना बसण्याची व्यवस्था होती. मात्र, गोगावले यांना पहिल्या रांगेऐवजी चौथ्या रांगेत बसविल्याचा मुद्दा काही नगरसेवकांनी उपस्थित केला.

कार्यक्रमात "राजशिष्टाचार' पाळला जात असली तरी, पक्षाचे शहराध्यक्ष आणि ज्येष्ठ म्हणून गोगावले यांना किमान पहिल्या-दुसऱ्या रांगेत जागा करून देणे अपेक्षित असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. त्यावरून काही जणांनी नाराजी व्यक्त केली. 

महापालिकेच्या कामकाजात गोगावलेंचे बारकाईने लक्ष असते. महत्त्वाच्या विषयांबाबत ते पदाधिकारी आणि नगरसेवकांशी नेहमी चर्चा करून निर्णय प्रक्रियेत सहभागी होतात. सर्वसाधारण सभेसह काही महत्त्वाच्या बैठकांनाही ते आर्वजून हजेरी लावत असतात. कामकाजातील हस्तक्षेपावरून गोगावले यांच्यावर टीकाही करण्यात आली. 
त्यात, पक्षातील नेतेही मागे राहिले नाहीत. या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून गोगावले महापालिकेत फारसे फिरकले नाहीत. मात्र, नायडू आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. तेव्हा, त्यांचा योग्य सन्मान झाला नसल्याची काही नगरसेवकांची ओरड आहे. प्रत्यक्षात मात्र, शहराध्यक्षाचा अशा कार्यक्रमांमध्ये म्हणावा तसा "पाहुणचार' शक्‍यही नसतो आणि राजशिष्टाचारात तो बसतही नाही, हे त्यांच्या समर्थकांना कोण सांगणार ?
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com