goa politics bjp and congress alert | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

येत्या आठवडाभरात गोव्यात मोठी राजकीय घडामोड 

अवित बगळे
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

गोव्यात भाजप आघाडीचे सरकार पाडण्यासाठी कॉग्रेसने नेटाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळू नये यासाठी भाजपने प्रसंगी नेतृत्व बदलाची तयारी चालवली आहे.

पणजी : गोव्यात भाजप आघाडीचे सरकार पाडण्यासाठी कॉग्रेसने नेटाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळू नये यासाठी भाजपने प्रसंगी नेतृत्व बदलाची तयारी चालवली आहे. येत्या आठवडाभरात त्यामुळे मोठी राजकीय घडामोड अपेक्षित आहे.  

भाजप व कॉंग्रेसच्या गोटात प्रचंड अस्वस्थता आहे. आपले आमदार एकसंघ कसे ठेवावेत ही कॉंग्रेसची चिंता आहे तर मंत्रिमंडळातही फेरबदलानंतर अस्वस्थतेचा उद्रेक वाढू नये हे भाजपच्या स्थानिक नेत्यांसमोर आव्हान आहे. या दोन्ही राजकीय तंबूंत अस्वस्थता असून फोडाफोडीचे राजकारण येत्या काही दिवसात गतिमान होईल असे दिसते. या साऱ्या पार्श्वभूमीवर कायम तोडग्याच्या दिशेने भाजपने प्रवास सुरु केला आहे. याच आठवड्यात त्याची वाच्यता केली जाणार आहे.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सध्या एम्समध्ये दाखल आहेत. नेतृत्वबदल करायचा असल्यास त्याचा निर्णय पर्रीकर यांनीच घ्यावा असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. पर्रीकर यांनी आपल्या हयातीत पक्ष वाढवला, सत्तेपर्यंत नेला असल्याने त्यांना अशावेळी दुखावू नका अशी त्यांची सक्त सूचना आहे. त्यामुळे नेतृत्व बदल करायचा झाल्यास त्याचा निर्णय पर्रीकरच करणार आहेत. गोवा फॉरवर्ड, मगो आणि अपक्षांना सोबत घेऊन जाण्याची क्षमता असलेल्याकडे मुख्यमंत्रीपद सोपविले जाण्याची शक्यता आहे. हळदोण्याच्या शिष्टमंडळाला भेटतेवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी हा हंगामी मंत्रीमंडळ बदल असल्याचे विधान केल्यामुळे राजकाणाला गती मिळणार हे स्पष्ट झाले आहे.

कॉंग्रेसने सत्ता स्थापनेसाठी कंबर कसणे सुरु केले आहे. सरकार स्थापन होऊ शकते या एका मुद्यामुळे कॉंग्रेसचे १६ आमदार एकसंघ राहिले आहेत, हे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी ओळखले आहे. त्यामुळे सातत्याने त्यांना राजकीय हालचाली करत राहणे भाग पडले आहे. कॉंग्रेस सरकार स्थापन करू शकत नाही हे स्पष्ट झाल्यास फूट पडण्याची भीती आहे. विरोधी गटाकडून तसे प्रयत्न सुरु आहेत याची कल्पनाही कॉंग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाला आहे.

राजकीय डावपेच गतिमान होत असतानाच महाराष्ट्रावादी गोमंतक पक्षाने था्ंबा आणि पहा अशी सावध भूमिका घेतली आहे. त्या पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी वारंवार मगोचा पाठींबा हा पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारला असून ते मुख्यमंत्रीपदी असेपर्यंत कायम असेल असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे बदलत्या समीकरणात मगो कोणासोबत याविषयी गुढ निर्माण झाले आहे.
 

संबंधित लेख