मित्रपक्षांच्या विस्तारवाढीच्या प्रयत्नांमुळे गोव्यात भाजपसमोर आव्हान

 मित्रपक्षांच्या विस्तारवाढीच्या प्रयत्नांमुळे गोव्यात भाजपसमोर आव्हान

पणजी : गोव्यातील भारतीय जनता पक्षासोबत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड हे प्रादेशिक पक्ष आघाडीत आहेत. याशिवाय सरकारमध्ये तीन अपक्षांचाही समावेश आहे. लोकसभेच्या निवडणुकीसोबत विधानसभेची निवडणूक होईल या शक्‍यतेने या दोन्ही पक्षांनी हातपाय पसरणे सुरु केले आहे. त्यामुळे भाजपच्या कटकटींत वाढ होताना दिसत आहे. 

म्हापसा शहराचे गेली 25 वर्षे ऍड. फ्रांसिस डिसोझा हे भाजपचे मंत्री प्रतिनिधीत्व करतात. मागील सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होते. त्यांना भाजपचेच कळंगुटमधील आमदार मायकल लोबो यांनी आव्हान देत म्हापशाच्या बकाल अवस्थेला डिसोझा हेच जबाबदार आहेत असा जाहीर आरोप केला होता. लोबो हे गोवा विधानसभेचे उपसभापतीही आहेत. लोबो यांच्या टीकेला उत्तर देताना डिसोझा म्हणाले, " लोबो यांनी कळंगुट मतदारसंघातील वेश्‍या व्यवसाय, अंमली पदार्थाचा व्यापार याकडे लक्ष द्यावे, त्यांनी म्हापशाची काळजी करू नये.' 

या दोन्ही नेत्यांना शांत करण्याचा प्रयत्न पक्ष संघटनेच्या पातळीवर अयशस्वी ठरल्यावर आता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी हा वाद मिटवावा अशी विनंती पक्षाने केली आहे. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सदानंदशेट तानावडे यांनी पक्षाने तशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली असल्याची कबुली दिली आहे. विधानसभेच्या गेल्यावर्षी झालेल्या निवडणुकीपूर्वी जन्माला आलेल्या गोवा फॉरवर्ड या पक्षाने चार जागा लढवून तीन जागा जिंकल्या आहेत. त्यांचे तिघेही आमदार (ज्यात पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांचाही समावेश आहे) आज मंत्री आहेत. त्या पक्षाने भाजपचे प्रवीण झांटये हे आमदार असलेल्या मये मतदारसंघात आपला शिरकाव केला आहे. 

झांटये यांच्याविरोधात गेल्यावर्षी विधानसभेची निवडणूक कॉंग्रेसच्या उमेदवारीवर लढविलेल्या संतोषकुमार सावंत यांना गोवा फॉरवर्डने आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. एवढेच नव्हे सावंत यांनी आयोजित केलेल्या अनेक कार्यक्रमांना कृषीमंत्री या नात्याने सरदेसाई उपस्थित राहिले आहेत. कोणत्याही सरकारी पदावर नसलेल्या सावंत यांनी आपल्या सोबत मंत्रालयात आणलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या सरदेसाई यांनी तत्काळ सोडवल्या. यामुळे स्थानिक आमदारांपेक्षा सावंत सरकार दरबारी कामे करून घेऊ शकतात असे चित्र निर्माण झाले आहे. 

गोवा फॉरवर्डने फोंडा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत अपक्ष लढलेले राजेश वेरेकर यांनाही पक्षात प्रवेश दिला आहे. त्याशिवाय सरदेसाई यांनी सहा मतदारसंघात पक्ष लढेल असे जाहीर केले आहे. त्यांचा हा विस्तारवाद भाजपला डोकेदुखी ठरणार असे दिसते. मगोचे तीन आमदार सध्या विधानसभेत आहेत, पैकी दोन मंत्री तर एक आमदार गोवा साधनसुविधा महामंडळ या प्रभावशाली महामंडळांचा अध्यक्ष आहे. त्यांनीही आपली संघटनात्मक बांधणी सुरु केली आहे. त्यात भाजपचे आमदार असलेल्या अनेक मतदारसंघांचाही समावेश आहे. 

मगोचे सुदिन ढवळीकर हे मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे उपचारासाठी अमेरिकेत जाताना ते ढवळीकर यांच्याकडे ताबा सोपवून जातील असे वाटत होते. खुद्द ढवऴीकर यांचीही तशी अपेक्षा असावी कारण त्यानंतर बोलताना होय मलाही मुख्यमंत्री व्हायचे आहे असे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. मात्र पर्रीकर यांनी त्यांच्याकडे ताबा न देता मंत्रिमंडळ सल्लागार समिती नेमली. त्यानंतर आता मगोचे अध्क्ष दीपक ढवळीकर यांनी मगो 16 मतदारसंघात विधानसभेची निवडणूक लढवणार असे जाहीर केले आहे. त्यामुळे सरकारमध्ये असूनही मगो आपले स्वतंत्र अस्तित्व जपूच नव्हे तर वाढवू पाहत आहे असे दिसते. भाजपचे आमदार असलेल्या काही मतदारसंघातही मगोचे संघटनात्मक काम सुरु केले आहे. तेही भाजपसमोरील कटकटी वाढवणारे ठरणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com