Goa Bhandari Politics Issue | Sarkarnama

गोव्यातील राजकारणाला भंडारी किनार

अवित बगळे
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

गोव्यात काँग्रेसच्या दयानंद सोपटे व सुभाष शिरोडकर या आमदारांनी राजीनामे देऊन भाजपमध्ये प्रवेश केला असला, तरी यापुढील राजकारणाला भंडारी किनार लाभण्याची शक्यता आहे. राज्यभरातील भंडारी समाज बांधव संधटीत करण्याचे काम सुरु आहे

पणजी : गोव्यात काँग्रेसच्या दयानंद सोपटे व सुभाष शिरोडकर या आमदारांनी राजीनामे देऊन भाजपमध्ये प्रवेश केला असला, तरी यापुढील राजकारणाला भंडारी किनार लाभण्याची शक्यता आहे. राज्यभरातील भंडारी समाज बांधव संधटीत करण्याचे काम सुरु असून भाजपचे राज्य उपाध्यक्ष अनिल होबळे, जे सध्या गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या कब्जातून समाज संघटना सोडविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. २७ नोव्हेंबर रोजी भंडारी समाजाचा अध्यक्ष निवडीसाठी मतदान आहे.

मांद्रे या मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत सोपटे यांनी लढण्याऐवजी केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी लढावे, त्याऐवजी सोपटे यांनी उत्तर गोवा लोकसभा निवडणूक लढवावी असा भाजपचा प्रयत्न असेल. सोपटे यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यानंतर त्या मतदारसंघातून सोपटे यांच्याकडून पराभूत झालेले माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मंगळवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांच्यावर टीकास्त्र सोडले ते पाहता भाजप मांद्रे मतदारसंघात जोखीम पत्करणार नाही असे दिसते. 

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर हे निवडणूक लढवणार आहेत. सोपटे, नाईक आणि चोडणकर हे भंडारी समाजाचे असल्याने त्यांच्या पाठीमागे भंडारी समाज उभा राहून मुख्यमंत्रीपद व दोन्ही खासदार ही पदे समाजाकडे खेचून आणण्याचे राजकारण भंडारी समाजाकडून खेळले जाणार आहे. त्यासाठी नवे नेतृत्व समाजाला देण्यासाठी माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी बऱ्यापैकी प्रयत्न चालवले आहेत. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या पॅनलमधून गोवा ऑलिंपिक असोसिएशनची निवडणूक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी लढवून याचा श्रीगणेशा केला आहे. अर्थात ते दोघेही विजयी झाले आहेत. 

त्याचीच पुनरावृत्ती लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकीत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सध्या गोव्याच्या मंत्रिमंडळात मिलिंद नाईक (भाजप), विनोद पालयेकर (गोवा फॉरवर्ड) आणि जयेश साळगावकर (गोवा फॉरवर्ड) असे तीन भंडारी मंत्री आहेत. सध्याचे भाजप आघाडी सरकार अस्तित्वात आणतानाही सारस्वत ब्राह्णण समाजाचे राजकीय नेते एकत्र आले आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई आणि अपक्ष आमदार असलेले महसूलमंत्री रोहन खंवटे हे सारस्वत ब्राह्मण आहेत. मगोचे नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर हे ब्राह्मण आहेत. 

ही समाज राजकारणाची किनार लक्षात येण्यास भंडारी समाजाच्या नेत्यांना दीड वर्ष लागले असले तरी आता ते कामाला लागले आहेत. त्यामुळे येत्या पोटनिवडणुकीत आणि लोकसभा निवडणुकींवर भंडारी समाजाचा ठराव उमटलेला दिसेल असे दिसते. गोव्यातले एकूण १४ लाखांच्या लोकसंख्येपैकी साडेतीन लाख जण भंडारी आहेत. या गोव्यातील सर्वात मोठ्या संख्येचा आणि संघटित समाज आहे. आजवर या समाजाने पक्ष न पाहता केवळ समाजाचा उमेदवार म्हणून मतदान केले आहे. त्याचमुळे मंत्रिमंडळ आणि विधानसभा यांच्यात भंडारी समाजाला पुरेसे प्रतिनिधीत्व असे. याच खेपेला केवळ चार भंडारी उमेदवार आमदार होऊ शकले आहेत. यामुळे भंडारी समाज एकसंघ राहिला नसल्याचे समाजाच्या नेत्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी समाज पून्हा संघटित करण्यासाठी पावले टाकणे सुरु केले आहे.

समाजाची लोकसंख्या साडेतीन लाख असली तरी केवळ साडेतीन हजार जणांनाच मतदानाचा अधिकार आहे. ५२५ रुपये भरून वर्षभरापूर्वी सदस्य झालेल्यांनाच मतदान करता येते. या साडेतीन हजारांपैकी अठराशे जण युवक आहेत. त्यामुळे समाजाची धुरा युवा नेतृत्वाकडे सोपवावी अशी चळवळ सुरु झाली आहे. शेकडोंच्या उपस्थितीत त्यांच्या बैठका सुरु झाल्या आहेत. त्याचे प्रतिबिंब येणाऱ्या निवडणुकांत उमटण्याचीच शक्यता अधिक आहे.

संबंधित लेख