Give Us Power We will exchange old notes - Prakash Ambedkar | Sarkarnama

सत्ता द्या आम्ही जुन्या नोटा बदलून देऊ : प्रकाश आंबेडकर 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 29 जुलै 2018

सध्या देशात सत्तेत असलेले सरकार जुमलेबाज सरकार आहे. मात्र ही जुमलेबाजी फार काळ टिकणार नाही. येत्या 15 ऑगस्टनंतर आम्ही सत्ताधाऱ्यांचा चेहरा लोकांसमोर आणण्यासाठी कपडेफाड आंदोलन सुरु करणार आहोत - प्रकाश आंबेडकर

नाशिक : देशात नोटाबंदीचा आधिकार पंतप्रधानाचा नव्हे, तर संसदेने रिर्झव बँकेला दिलेला आहे. तसेच प्रत्येक नोटेवर जेव्हा नोट सादर करेल, तेव्हा तिची किंमत परत देण्याची हमी दिलेली असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिर्झव बॅकेचा आधिकार वापरुन जुमला केला आहे. त्यामुळे नोटा सांभाळून ठेवा. आम्ही त्या बदलून देऊ," असे आवाहन भारीप- बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले. 

भारिप- बहुजन महासंघातर्फे येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात वंचित बहुजन आघाडीचा मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याला मोठी गर्दी होती. यावेळी ते म्हणाले, ''सध्या देशात सत्तेत असलेले सरकार जुमलेबाज सरकार आहे. मात्र ही जुमलेबाजी फार काळ टिकणार नाही. येत्या 15 ऑगस्टनंतर आम्ही सत्ताधाऱ्यांचा चेहरा लोकांसमोर आणण्यासाठी कपडेफाड आंदोलन सुरु करणार आहोत. चार्वाकापासून या देशात क्रांती व प्रतिक्रांती यांच्यात वर्चस्वाचा संर्घष सुरु आहे. समतेच्या स्थापनेसाठी वंचित, ओबीसी, बहुजनांना पून्हा एकदा क्रांती करण्याची वेळ आली आहे. आगामी निवडणूका ही त्यासाठी चांगली संधी आहे. त्यात वंचितांनी मनुवाद्यांशी दोन हात करायची असेल, तर सध्याची मानसिकता बदलून तयारीला लागावे." 

''वंचित बहुजन आघाडीला यशस्वी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने मनातील मनुवाद काढावा. आगामी निवडणूकात आपण सगळे एकसमान आहोत. याच विचाराने प्रत्येकाने काम करा. उमेदवार कोण? त्याच्या जातीचे मतदार किती, अशा चर्चांना थारा न देता, आम्ही विषमता मानीत नाही, विषमता मातीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, या विचाराने कामाला लागावे," अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख