Give respect to party workers | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

राजकारणाचे फंडे : कार्यकर्त्याला सन्मानाने वागवा...तोच तुम्हाला मंत्री करेल - कै. साहेबराव पाटील डोणगावकर

जयंत महाजन
मंगळवार, 30 मे 2017

राजकारणातील चढउतारात आणि वेगवेगळ्या लाटांमध्येही काही नेत्यांचे गड अभेद्य रहातात. त्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे त्यांनी मतदारसंघावर पकड घट्ट ठेवलेली असते. कार्यकर्त्यांचे भक्कम जाळे विणलेले असते. त्यांचे कार्यकर्ते प्रतिस्पर्ध्याच्या दबावाला भीक घालीत नाहीत आणि प्रलोभनाला बळीही पडत नाहीत. असे नेते सर्वसामान्य कायकर्त्याला सन्मानाची आणि बरोबरीची वागणुक देऊन जिंकून घेतात. साहेबराव पाटील डोणगावकर अशा नेत्यांच्या परंपरेतील एक महत्वाचे नाव .

कै. साहेबराव पाटील डोणगावकर यांचे एकेकाळी औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणात मोठे प्रस्थ होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, गंगापूर कारखान्याचे चेअरमनपद, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालकपद अशी  अनेक महत्वाची पदे त्यांनी भाषाविली होती . इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सहानुभूतीची लाट होती.

या सहानुभूतीच्या लाटेत देखील काँग्रेस विरुद्ध काँग्रेस एसचे महाराष्ट्रात दोन खासदार निवडून आले होते. एक होते शरद पवार आणि दुसरे साहेबराव डोणगावकर !  दिलखुलास आणि बेधडक व्यक्तिमत्त्वाचे साहेबराव, शरद पवार यांचे निष्ठावंत सहकारी होते. जिल्ह्यात अण्णा म्हणून ते परिचित होते.

ही गोष्ट आहे १९८८ मधील. कन्नड कारखान्याच्या गळीत हंगाम प्रारंभ कार्यक्रमास कै. आ. रायभान जाधव यांनी अण्णांना प्रमुख पाहुणे म्हणून  बोलावले होते. या दोघांबरोबर वार्ताहर म्हणून मी गेलो होतो. कन्नड पूर्वी गंगापूर तालुक्‍यात एका गावी आम्ही पोहोचलो. अण्णांच्या एका कार्यकर्त्याच्या घरी भेटीगाठी व चहापान आटोपून पुढे निघालो. तेव्हा अण्णांच्या अँम्बेसेडॉर कारमध्ये आमच्यासह सात  माणसे दाटीवाटीने बसलेली होती. अण्णा धुळीची पर्वा ना करता कारच्या काचा खाली ठेवीत असत. रस्त्यात परिचितांना हात दाखवीत. त्यामुळे एअर कंडिशनर बंद असे.

गाडी गावाबाहेर पडताना वळणावर एस . टी . बसस्टॉप होता. तिथून आवाज आला अण्णा.. अण्णा ! . ती  हाक ऐकताच अण्णांनी ड्रायव्हरला गाडी थांबवयाला लावली . हाक कोणी मारली हे वळून पहिले. मग कार मागे बसस्टॉपपर्यंत रिव्हर्स घ्यायला लावली. एक चाळिशीतील कार्यकर्त्याने त्यांना नमस्कार केला. अण्णा कारमधून खाली उतरले. कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात ठेवून दोन मिनिटे मोठ्या आवाजात त्याच्याशी हास्य विनोद केले. गप्पा मारल्या. मग ते कारकडे वळले तर त्या कार्यकर्त्याने त्यांच्याबरोबरच कन्नडला येण्याचा आग्रह धरला. कारमध्ये तर पाय ठेवायलाही जागा नव्हती.

अण्णांनी एकदा सभोवार नजर फिरवली. ते कारमध्ये बसले व त्या कार्यकर्त्यास म्हणाले, ये बैस. अण्णांनी त्याला जवळपास आपल्या मांडीवरच बसवून घेतले.  सर्वांनाच खूप अडचण होत होती. कार २-३  किलोमीटर पुढे गेल्यावर मोठा रस्ता लागला. मग अण्णा त्या कार्यकर्त्याला म्हणाले, ''मित्रा माझ्या पायाला खूप रग लागलीय. कारमध्येही दाटीवाटी आहे. कसे करतो?'' कार्यकर्ता म्हणाला, अण्णा कार थांबवा. मी उतरतो येथे. त्याने बाहेर उतरून कारचा दरवाजा धाडकन लावला आणि अण्णांना तीन-तीनदा वाकून नमस्कार करून अत्यानंदाने चालू लागला.

कन्नडचा कार्यक्रम पार पडला. औरंगाबादकडे परतीच्या प्रवासात अण्णासोबत मी एकटा होतो. त्यांना विचारले, कन्नडकडे जाताना त्या गावातून कारमध्ये जागा नसतानाही तुम्ही एका कार्यकर्त्याला बसवून घेतले आणि ५ मिनिटांनी त्याला उतरवून दिले. त्याने काय साध्य झाले? तुम्ही एकतर त्याला कारमध्ये बसवायचेच नव्हते किंवा शेवटपर्यंत सोबत घ्यायचे होते. असे मधेच उतरवून दिल्याने तो नाराज नसेल का झाला?

त्यावर साहेबराव अण्णा हसत म्हणाले, ''तुमचे शिक्षण कॉलेजचे आहे आमचे शिक्षण जीवनाच्या शाळेतले आहे. इथे माणसे पुस्तकासारखी वाचता आली पाहिजेत. त्या कार्यकर्त्याने जेथे मला मोठ्याने हाक मारली तो बसस्टॉप होता. तेथे वीस-पंचवीसजण उभे होते. त्यात सामान्य नागरिक जसे होते तसे माझ्या राजकीय विरोधकांचे - समर्थकही होते. मी जर त्याच्यासाठी थांबलो नसतो तर विरोधी कार्यकर्त्यांनी माझ्या माणसाची टर उडवली असती. त्याचा अपमान केला असता.

"म्हणून त्याने हाक मारताच मी कार रिव्हर्स घेऊन खाली उतरलो. इथे माझ्या कार्यकर्त्याची सरशी झाली. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्याशी हास्यविनोद करीत असल्याचे सर्वांनी पाहिल्याने त्याची कॉलर ताठ झाली. कारमध्ये जागा नाही हे देखील सर्वांनी पाहिले होते. तरीही त्याने विनंती करताच मी त्याला कारमध्ये बसवून घेतले. एवढेच नव्हे तर माझ्या मांडीवर बसवून घेतले हे देखील सर्वांनी पाहिले.''

''त्याच्या अपेक्षेपेक्षा मी त्याला भरभरून दिले. त्याचा सन्मान राखला. त्यामुळे सर्वांसमक्ष त्याला माझ्या कारमध्ये बसणे महत्त्वाचे व प्रतिष्ठेचे होते. त्याचा हा हेतू साध्य झाल्याने तो पाच मिनिटांनी कारमधून उतरायला तयार झाला. त्याला कन्नडला यायचेच नव्हते. खासदार आपल्याला कारमध्ये जागा नसताना देखील बसवून घेतात हे इतरांना  त्याला दाखवायचे होते.''

"मी त्याचा सन्मान राखल्याने तो आता येत्या निवडणुकीत माझ्या पॅनेलचे जोरात व उत्साहात काम करणार. विरोधक पैशाने किंवा प्रलोभनाने त्याची निष्ठा खरेदी करू शकणार नाही. कार्यकर्ता प्रेमाच्या चार शब्दांचा भुकेला असतो. त्याला बरोबरीने वागवा, सन्मानाने वागवा. त्याच्या सुखदुःखाला धावून जा. तो तिथे आहे म्हणून मीइथे मोठा झालो आहे. कार्यकर्त्याला योग्य सन्मान द्या, तोच तुम्हाला आमदार, खासदार मंत्री करीत असतो'' या शब्दात साहेबरावानी त्यांच्या राजकारणाचा फंडा सांगितला होता. आज आण्णा  हयात नाहीत पण त्यांचा फंडा मात्र आजही कायम आहे.

संबंधित लेख