Give BJP's Rains to Nitin Gadkary Demands Kishore Tiwari | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपची सूत्रे गडकरींकडे द्यावी : किशोर तिवारी यांची संघ प्रमुखांकडे मागणी 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

छत्तीसगड, राजस्थान व मध्यप्रदेशात भाजपच्या पराभवानंतर आता अंतर्गत धूसफूस समोर येऊ लागली आहे. राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेल्या वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपची सूत्रे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे द्यावी, अशी मागणी केली आहे

नागपूर : छत्तीसगड, राजस्थान व मध्यप्रदेशात भाजपच्या पराभवानंतर आता अंतर्गत धूसफूस समोर येऊ लागली आहे. राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेल्या वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपची सूत्रे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे द्यावी, अशी मागणी केली आहे. 

भाजपमध्ये काही लोकांचे वर्चस्व आले असून इतरांना आपले मत व्यक्त करता येत नाही, यामुळे पक्षाच्या अनेक नेत्यांमध्ये तसेच खासदारांमध्ये नाराजी लपून राहिलेली नाही. यामुळेच काही खासदारांनीही भाजपला रामराम ठोकला आहे. या पार्श्‍वभूमीवर किशोर तिवारी यांनी केलेल्या मागणीमुळे नव्या चर्चेला सुरूवात झाली आहे. तिवारी 'संघ परिवारा'तील म्हणून ओळखले जातात. तिवारी यांनी प्रसिद्धी पत्रक जारी केले असून हे पत्र संघ परिवार तसेच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना हे पत्र पाठविले आहे. 

नोटबंदी, जीएसटी व महागाईमुळे सामान्य जनतेला जोरदार फटका बसत आहे. यात पक्ष नेतृत्वाच्या या वागण्यांमुळे लोकांमध्ये पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. या पार्श्‍वभूमीवर नितीन गडकरी सारख्या 'मवाळ' नेत्याकडे पक्षाची सूत्रे देण्याची वेळ आल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे. पक्षाने 2012 मध्ये पक्षाची सूत्रे नितीन गडकरी यांच्याकडे दिली होती. परंतू, खोट्या आरोपामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. गडकरी यांच्यावर केलेले सर्व आरोप खोटे निघाले व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना माफी मागावी लागली. 

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला. गडकरी यांच्याकडे पक्षाची सूत्रे राहीली असती तर हा पराभव झाला नसता, असा दावाही तिवारी यांनी पत्रकात केला आहे. भाजपची अशी दैनावस्था निश्‍चितच झाली नसती, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे. हुकूमशाहीने पक्ष व देश चालविणारे नेते भविष्यात घातक सिद्ध होतात, हा इतिहास आहे. यातून आपण निश्‍चितपणे बोध घेतला पाहिजे, असा सल्लाही तिवारी यांनी दिला आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी भाजपच्या नेत्यांनी केलेली चूक दुरूस्त करून भाजपची सूत्रे पुन्हा नितीन गडकरी यांच्याकडे देण्यात यावी, अशी मागणी तिवारी यांनी केली आहे.
 

संबंधित लेख