girish mahajan meetin with anna hajare in ralegansidhhi | Sarkarnama

गिरीश महाजनांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावून दिला, पण काही उपयोग झाला नाही!

मार्तंडराव बुचुडे 
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

अण्णा हजारे यांच्या 70 टक्के मागण्यांबाबत सरकारने निर्णय घेतला आहे. आता उर्वरीत मागण्यांबाबतही चर्चा सुरू आहे. त्यामुळे हजारे यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही व सरकारही हजारे यांना आंदोलन करण्यास भाग पाडणार नाही, असे महाजन यांनी सांगितले.

राळेगणसिद्धी (जि. नगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्यात तासभर चर्चा झाली. महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी हजारे यांच्याशी बोलणे करून दिले, पण जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आपण उपोषणावर ठाम असल्याचे हजारे यांनी सांगितले. 

हजारे यांनी विविध मागण्यांसाठी दोन ऑक्‍टोंबरपासून राळेगणसिद्धी येथे आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयापासून त्यांना परावृत्त करण्यासाठी व सरकारने हजारे यांच्या मागण्यांबाबत काय निर्णय घेतले आहेत, याची माहीती देण्यासाठी महाजन आज येथे आले होते. त्यांची सुमारे एक तास चर्चा झाली व उभयतांनी एकत्र भोजनही घेतले.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले, हजारे यांच्या मागणीप्रमाणे शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट बाजारभाव देण्याचा कायदा सरकारने केला आहे, तसेच ठिबक संचावर 18 टक्‍यांएवजी 12 टक्के जीएसटी कमी केला आहे, मात्र हजारे यांनी तो चार टक्के करावा, असे सूचविले आहे. त्याबाबत आम्ही सरकारी पातळीवर निर्णय घेणार आहोत. याबाबत हजारे यांचे मुख्यमंत्र्यांशी बोलणे करून दिले आहे. तसेच लोकपाल व लोकायुक्त नेमणुकीच्याबाबत सरकार अंतीम टप्यात आहे. लवकरच त्यांची नेमणूक होणार आहे. त्यांच्या नियुक्तीमधील अडथळे दूर झाले आहेत. निवडणूक प्रक्रीयेतील सुधारणांबाबत आम्ही निडणूक आयोगास कळविले आहे. त्यांनी निर्णय घेतल्यानंतर आम्ही हजारे यांनी कळवू. बहुतेक सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे हजारे यांनी उपोषण करण्याची वेळ येणार नाही.

हजारे म्हणाले, सरकारने अनेक मागण्यांबाबत निर्णय घेतले आहेत. मात्र काही मागण्यांबाबत निर्णय घेणे बाकी आहे. याबाबत मला सरकारकडून अद्यापही काहीच लेखी आले नाही. त्यामुळे दोन ऑक्‍टोबरच्या उपोषणावर मी ठाम आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख