जळगाव, पालघरनंतर धुळ्यातही आम्हीच - गिरीश महाजन 

जळगाव, पालघरनंतर धुळ्यातही आम्हीच - गिरीश महाजन 

जळगाव : देशात नरेंद्र मोदींसारखे कणखर, पोलादी पुरुषाचे नेतृत्व आहे. काँग्रेसकडे कोणतेही सक्षम नेतृत्व नाही, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींना पर्याय नाही. पुन्हा एकदा भाजप स्पष्ट बहुमत मिळवून मोदींच्या नेतृत्वात सरकार येणार, असा विश्‍वास जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी 'सरकारनामा'च्या लाइव्ह मुलाखतीतून व्यक्त केला. 'सरकारनामा' फेसबुक पेजवरील या मुलाखतीत त्यांनी पक्षाच्या आगामी वाटचालीचा परामर्श घेतला. 

 
जामनेर येथे त्यांच्या निवासस्थानी मुलाखत घेण्यात आली. 'सकाळ' खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक राहुल रनाळकर यांनी त्यांच्याशी थेट संवाद साधाला, यावेळी महाजन यांनी त्यांचा राजकीय जीवनपट उलगडला. 

त्यांच्याशी झालेल्या प्रश्नोत्तरांचा गोषवारा असा - 

- येणाऱ्या 2019च्या लोकसभा निवडणुकीकडे आपण कसे पाहाता? 
महाजन : येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपचे सरकार सत्तेत येणार आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये गेल्या काळात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने यश मिळवत सर्व ठिकाणी सरकार स्थापन केले आहे. पंजाबचा अपवाद वगळता काँग्रेसकडे आज स्वत:च्या बळावर कुठलेही राज्य सत्तेत नाही. सक्षम नेतृत्वाचाही विरोधी पक्षाकडे अभाव आहे. एकाच कुटुंबाकडे नेतृत्व असल्याने त्याची अवस्था काय आहे, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातही मोदींना पर्याय नाही. त्यामुळे देशात नरेंद्र व राज्यात पुन्हा देवेंद्र हेच सक्षम नेतृत्व म्हणून सत्तेत राहील. 

- पालघर, जळगाव पाठोपाठ आता धुळ्याच्या निवडणुकीबाबत आपले नियोजन कसे आहे? 
महाजन : पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझ्यावर पक्षाने जी जबाबदारी सोपवली ती आपण प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतो. पक्षाच्या सक्षम टीमच्या माध्यमातून आम्ही पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत यश मिळविले. जळगाव मनपा निवडणुकीत विकासाचा शब्द दिला, जनतेने विश्‍वास दर्शविला आणि आम्हाला तीन चतुर्थांश मताधिक्‍य देत सत्ता सोपवली. दिलेल्या शब्दानुसार जळगाव शहरासाठी शंभर कोटींचा निधी मंजूर करुन आणला, आणखी शंभर कोटी वर्षभरात आणू. आता पक्षाने धुळे मनपाची जबाबदारी सोपवली असून त्याठिकाणी सध्या आमचे केवळ तीनच नगरसेवक आहेत. मात्र, मंत्री डॉ. सुभाष भामरे, जयकुमार रावल, शहराध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या सहकार्यातून आम्ही 'फिफ्टी प्लस'चे मिशन ठेवले आहे. त्यामुळे धुळ्यातही भाजपचाच महापौर होईल. 

- एवढा व्याप सांभाळून लोकांमध्ये आपण कसे रमता, एवढी ऊर्जा कशी येते? 
महाजन : शालेय, महाविद्यालयीन जीवनापासूनच मी विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत आलो आहे. लेझीम, ढोल-ताशे वाजविण्याची तरुण असल्यापासून सवय आहे. सर्वसामान्यांमध्ये राहून त्यांच्यात मिसळून मी राहतो. आमदार किंवा मंत्री असलो तरी माझ्यात कार्यकर्ता हा स्थायी भाव असल्याने आजही मंत्रिपदाच्या व्यापातून आपण लोकांमध्ये रमतो. शिवजयंती, गणेशोत्सव, आंबेडकर जयंती अशा विविध मिरवणुकांमध्ये आपण लेझीम खेळतो, ढोलही वाजवितो. जामनेर मतदारसंघात पत्नी व मी गेल्या वीस वर्षांपासून कार्यरत आहोत. सुरवातीला सरपंच, नंतर 25 वर्षांपासून आमदार आणि आता मंत्री तर पत्नी जिल्हा परिषद सदस्य व आता नगराध्यक्ष म्हणून जनतेची सेवा करीत आहे. कार्यकर्त्यासारखे राहिल्याने जनतेचे प्रेम मिळत गेले, यापुढेही असे सेवाकार्य सुरुच ठेवू. 

#नातंशब्दांशी #दिवाळीअंक #प्रभावीनेते #युवानेतृत्व #सरकारनामा #SarkarnamaDiwali

या मुलाखतीचे आधीचे भाग आवर्जून वाचा - 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com