Girish Mahajan & Family celebrate Diwali in tribal village | Sarkarnama

गिरीश महाजनांनी साधनाताईंसह आदिवासी पाड्यावर साजरी केली दिवाळी

सचिन जोशी 
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी चोपडा तालुक्‍यातील दुर्गम आदिवासी पाड्यावर जाऊन दीपोत्सव साजरा केला.

जळगाव  : "चलो जलाएं दीप वहॉं.. जहॉं अभीभी अंधेरा है..' या माजी पंतप्रधान (कै.) अटलजींच्या कवितेस अनुसरून राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी चोपडा तालुक्‍यातील दुर्गम आदिवासी पाड्यावर जाऊन दीपोत्सव साजरा केला. आदिवासी बांधवांना मिठाईवाटप करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडविण्याची ग्वाहीदेखील दिली. 

गिरीश महाजन दरवर्षी आदिवासी पाड्यांवर जाऊन दिवाळी साजरी करतात. यंदाही त्यांनी कुटुंबियांसोबत चोपडा तालुक्‍यातील अतिदुर्गम अशा पांढरीपाडा या वस्तीवर जाऊन तेथील आदिवासी बांधवांसोबत दिवाळीचा उत्सव साजरा केला. जामनेरच्या नगराध्यक्षा त्यांच्या सुविद्य पत्नी साधना महाजन, महाजनांची कन्याही यावेळी उपस्थित होती. 

पांढरीपाड्यातील आदिवासी बांधवांच्या घरी ज्याठिकाणी वीजही नाही, अशा घरांमध्ये पणत्या, दीप लावण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आले. या गावातील आदिवासी कुटुंबांना कपडे, मिठाई, फराळवाटपही यावेळी करण्यात आले. रात्रभर महाजनांनी आदिवासी बांधवांसोबत चर्चा केली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या पारंपरिक उत्सवातही ते सहभागी झाले. तीर-कामटा चालवून, ढोल वाजवून हा उत्सव महाजन आणि कुटुंबीयांनी साजरा केला. 

मंत्र्यांच्या उपस्थितीत दिवाळी साजरी करायला मिळाल्याने आदिवासी कुटुंबीय कमालीचे भारावले होते. त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद व समाधान दिसून आले. या कुटुंबांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे मतही महाजनांनी व्यक्त केले.   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख