Girish Mahajan directs police to find stolen 20 hens ! | Sarkarnama

गिरीश महाजनांचे फर्मान निघाले, अन पहूर पोलीस शोधात निघाले त्या २० कोंबड्या !

सुरेश महाजन 
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

आता  लहान लहान कोंबड्या शोधायच्या कश्या असा प्रश्न पोलिसांना पडला नसेल तरच नवल ! शिवाय कोंबड्या आतापर्यंत जिवंत असल्या तर सापडतील ! पण पहूर पोलिसांना जिंदा हो या मुर्दा मुर्गा शोधावेच लागेल . पोलीस ठाण्यात अट्टल आरोपींना पोलीस मुर्गा बनण्याची शिक्षा देतात म्हणे ! पण कोंबड्या शोधण्या पेक्षा ही शिक्षा बरी म्हणायची !

जामनेर :   ' माझा कोबंडा कोणी मारीयला' असे गीत प्रसिध्द आहे. मात्र त्याच प्रमाणे ' माझ्या कोबंड्या कोणी चोरीयल्या'अशी कैफियत घेवून पोल्ट्रीफार्मचा मालक जलसंपदा गिरीश महाजन यांच्याकडे आला. अन त्यांनीही ताबडतोब पोलीस स्टेशनला फोन करून त्या चोरीस गेलेल्या कोबंड्यांची कसून चौकशी करावी असा  आदेश पोलिसांना  दिला.  आता थेट गिरीशभाऊंनीच आदेश दिलाय म्हंटल्यावर अन पोल्ट्रीचालकाचा जीव भांड्यात पडला.ही घटना आहे, महाजन यांच्या मतदार संघाच्या जामनेर तालुक्‍यातील शेंदुर्णी येथील. 

'माझ्या कोंबड्या चोरीचा तपास लावण्याचे पहुर पोलीसांना सांगा भाऊ...' अशी कैफीयत आज शेंदुर्णी (ता. जामनेर) येथील हिंदु चिकन सेंटरचे मालक भोला गुजर यांनी चक्क मंत्री गिरीश महाजनांकडे मांडली. त्यांची तक्रार पाहून महाजनही आश्‍चर्यचकित झाले. पण करतात काय ? राजकारण म्हणजे २४/७ धंदा . कोणाला नाही म्हणायची सोय नाही . प्रत्येकाला हसतमुखाने सामोरे जाणे आणि त्याच्याशी चार शब्द चांगले बोलणे हा तर गिरीश महाजन यांचा फंडा . त्यामुळे त्यांनी पोलिसांना सांगून चक्र फिरवली . 

भोला गुजर यांनी आधी पहूर पोलीसांकडे कोंबड्या चोरी झाल्याची तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र, दखल घेतली नाही म्हणून त्यांनी थेट जामनेर गाठले. आपल्या पोट्री फार्ममधुन मजबुत लोखंडी जाळी तोडुन तब्बल वीस कोंबड्या चोरून नेल्याचे मंत्री गिरीश महाजनांना सांगितले. कोंबड्या चोरीच्या घटनेची माहीती ऐकल्यानंतर लागलीच गिरीश महाजन यांनी पहुर येथील पोलिस ठाण्याशी संपर्क साधला आणि कोंबड्या चोरीच्या घटनेचा कसुन तपास करण्याचे फर्मावले.

 तसे पाहीले तर गिरीश महाजनांकडे नेहमीच कोणी ना कोणी लहानमोठ्या तक्रारी निःसंकोचपणे   घेऊन येतात आणि गिरीश महाजन त्यांचे आपल्या परीने समाधान करून देतात. आज मात्र कोंबड्या चोरीची कैफीयत ऐकताच ते चांगलेच आश्‍चर्यचकित झाले आणि तितक्‍याच गांभीर्याने पोलिसांना तपासाच्या सुचना केल्या. 

याबाबत भोला महाजन यांनी सांगितले, " चार वर्षांपुर्वी माझ्या पोल्ट्री फार्ममधुन कोंबडया चोरीला गेल्या होत्या. आता पुन्हा आठच दिवसांपुर्वी आणखी दुसऱ्यांदा वीस कोंबड्या चोरून नेल्या. पहुर पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने कोंबडया चोरीची घटना मी मंत्री महाजनांना सांगितली."

उत्तर प्रदेशात समाजवादी  पार्टीचे नेते आझम खान यांच्या म्हशी २०१४ मध्ये चोरीस गेल्यानंतर रामपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि बड्या अधिकाऱ्यांचा फौजफाटा तपासात गुंतला होता . त्यानंतर आता महाराष्ट्रात जळगाव-  जामनेर - पहूर  पोलिसांवर अशी अतुलनीय कामगिरी येऊन पडली आहे . आझम खान यांच्या तरी म्हशी मोठ मोठ्या होत्या . आता  लहान लहान कोंबड्या शोधायच्या कश्या असा प्रश्न पोलिसांना पडला नसेल तरच नवल ! शिवाय कोंबड्या आतापर्यंत जिवंत असल्या तर सापडतील ! पण पहूर पोलिसांना जिंदा हो या मुर्दा मुर्गा शोधावेच लागेल . पोलीस ठाण्यात अट्टल आरोपींना पोलीस मुर्गा बनण्याची शिक्षा देतात म्हणे ! पण कोंबड्या शोधण्या पेक्षा ही शिक्षा बरी म्हणायची !

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख