बेवड्या कार्यकर्त्यांना गणेशोत्सवात धडा शिकविण्याचा मंत्री बापटांचा निर्धार

बेवड्या कार्यकर्त्यांना गणेशोत्सवात धडा शिकविण्याचा मंत्री बापटांचा निर्धार

पुणे : पुण्यातील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मागण्या समजूत घेत, पालकमंत्री गिरीश बापट यांनी पोलिसांपुढे कार्यकर्त्यांची बाजू मांडली. काही निर्णयांवरही तोडगाही काढला, पण उत्सवात दारू पिऊन धूमाकूळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना धडा शिकविण्याचा इरादा बापटांनी केला.

"उत्सवात दारुड्यांना कोणीही पाठिशी घालू नका, त्यांना पोलिसांच्या ताब्यातूून सोडविण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांची नावे जाहीर करू,' अशा शब्दांत बापटांनी गणेशोत्सवातील अतिउत्साही कार्यकर्त्यांना तंबी दिली. साऊंड सिस्टीम आणि दारूपासून गणेशोत्सव लांब ठेवा, असे आवाहनही बापटांनी केले. बापटांचा हा इशारा मद्यपी खरेच मनावर घेतील का, याची उत्सुकता आहे.

 
गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर बापट यांच्यासमवेत महापालिका प्रशासन, पोलिस अधिकारी आणि प्रमुख गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक बुधवारी झाली. तेव्हा, बापटांनी कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांच्या तक्रारी पोलिसांपुढे मांडत काही बाबी सोडविल्याही. त्यामुळे बापट कार्यकर्त्यांचीच बाजू लावून धरत असल्याचे बैठकीदरम्यान दिसून येत होते. मात्र, उपद्रवी कार्यकर्त्यांचा मुद्दा स्वत: उपस्थित केला आणि त्यांना हिशेबात राहण्याचा दमही त्यांना भरला.

 
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान काही कार्यकर्ते दारू पिऊन धिंगाणा घालत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे उत्सवाला गालबोट लागल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच, कार्यकर्ते आणि पोलिसांमध्येही वाद होतात. या पार्श्‍वभूमीवर बापटांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सबुरीचा सल्ला दिला. तेव्हाच त्यांचे कानही टोचले. 

बापट म्हणाले, ""उत्सवाचे पावित्र्य राखले पाहिजे. काही मंडळे उगाचच साऊंड सिस्टिीम उभारतात. ज्यामुळे सामान्य लोकांचा प्रचंड त्रास होतो. अशा प्रकारे मंडळांनी वागू नये. उत्सवसाठी मांडव आणि कमानी उभारण्याबाबत न्यायालयाच्या नियमांचा आदर केला पाहिजे. ज्या मंडळांनी गेल्या वर्षी जेवढा मांडव उभारला होता, तेवढाच यंदाही उभारावा. त्यांना परवानगी दिली जाईल. त्या वेळेत मिळतील. त्यासाठी महापालिका आणि पोलिसांना काही सूचना केल्या आहे. कार्यकर्त्यांना हेलपाटे मारू देणार नाही.'' 

""उत्सवातील गर्दी लक्षात घेता, मंडळांनी सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या पाहिजेत. गरजेच्या पुरत्याच किमान कमानी उभाराव्यात. त्यातून वाहतूक खोळंबणार नाही, याची काळजी घ्या,'' असा सल्लाही त्यांनी दिला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com