गिरीश बापट यांचा मनाचा असाही मोठेपणा! 

पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट हे सार्वजनिक कार्यक्रमातील संकुचित अशा वागण्याला अपवाद म्हटले पाहिजेत.तीन-चार कार्यक्रमांत त्यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून दिला. सोबत विरोधकांचाही सन्मानपूर्वक उल्लेख केला. विरोधकांना न बोलविण्याचीचूक झाल्याबद्दल स्वतःच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही कानपिचक्‍या दिल्या. या कानपिचक्यानंतर सत्ताधारी पक्ष सुधारेल का?
गिरीश बापट यांचा मनाचा असाही मोठेपणा! 

पुणे : राजकारणात श्रेयाची लढाई सदैव सुरू असते. एखादे शौचालय बांधलेले असो की मेट्रो! तिथे आपलेच नाव लागले पाहिजे. त्या विकासकामात आपले काही योगदान असो किंवा नसो. आपण पदावर असले म्हणजे मीच सगळे केले आहे. माझ्यामुळेच सगळे झाले आहे, अशा अविर्भावात राजकीय नेते वावरत असतात.

समजा एखादा नेता पदावर येऊन दहाच दिवस झाले आहेत. जुन्या पदाधिकाऱ्याच्या प्रयत्नाने एखादे काम मार्गी लागलेले असेल आणि त्याचे उद्‌घाटन नव्या पदाधिकाऱ्याच्या हस्ते होणार असेल तर या जुन्या पदाधिकाऱ्याला त्या कार्यक्रमालाही बोलवले जात नाही. जुना पदाधिकारी विरोधी पक्षातील असला तर त्याचा नामोल्लेखही होत नाही. कार्यक्रम पत्रिकेत नाव असणे किंवा त्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळणे ही तर दूरची गोष्ट. 

पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट मात्र अशाबाबतीत अपवाद म्हटले जावेत.  तीन-चार कार्यक्रमांत त्यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून दिला. सोबत विरोधकांचाही सन्मानपूर्वक उल्लेख केला. चूक झाल्याबद्दल स्वतःच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही कानपिचक्‍या दिल्या. इंदापूर नगरपालिकेच्या सभागृहाचे उद्‌घाटन बापट यांच्या हस्ते 19 मे रोजी झाले. या कार्यक्रमाला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना निमंत्रित न केल्याबद्दल तेथील कॉंग्रेसच्या मंडळींनी कार्यक्रमावर बहिष्कार घातला. यावर बापट यांनी कार्यक्रमात बोलताना नाराजी व्यक्त केली. पाटील यांनी या इमारतीसाठी निधी मंजूर करून आणला होता. जागा मिळवून दिली होती, याचे श्रेय देत त्यांना या कार्यक्रमाला निमंत्रित करायला हवे होते, हे स्पष्ट सांगितले. 

पुण्यात काही दिवसांपूर्वी म्हाडाच्या इमारतीचे उद्‌घाटन झाले. म्हाडा पुणेचे अध्यक्ष अंकुश काकडे यांच्या कारकिर्दीत ते काम मार्गी लागले होते. सत्ताधारी भाजपने हा कार्यक्रम आयोजित केला असल्याने साहजिकच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे असलेल्या काकडे यांना निमंत्रण नव्हते. त्यावेळीही बापट यांनी आपल्याच भाजपच्या मंडळींना कानपिचक्‍या देत ज्याने या कामासाठी कष्ट घेतले, त्याला निमंत्रण द्यायला हवे होते, असे स्पष्टपणे सांगितले. 

याचे दुसरे मोठे उदाहरण म्हणजे पुण्यात स्मार्ट सिटीच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम. हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होता. त्या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता होती. महापौर प्रशांत जगताप हे राष्ट्रवादीचेच होते. त्यांना पंतप्रधानांच्या उपस्थितीत व्यासपीठावर स्थान द्यायचे की नाही, यावरून वाद निर्माण झाला होता. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी स्वतः बापट यांनी पत्रकार परिषद घेऊन महापौरांना व्यासपीठावर बसविण्यात असण्याचे जाहीर केले होते. पुण्यात मेट्रोच्या भूमिपूनजनाचा कार्यक्रम पंतप्रधानांच्या हस्ते झाला होता. या कार्यक्रमालाही सर्वपक्षीय खासदार व्यासपीठावर उपस्थित होते. 

राजकीय पदाधिकारी निमंत्रण पत्रिकेतील नावे, ना फलकावरील स्थान यासाठी फार संवेदनशील असतात. आपल्याचा पक्षाच्या मंडळींवर कुरघोडी करण्याचे दिवस असताना विरोधी पक्षाला स्थान देण्याची कल्पना तर सुचने फारच दूरची गोष्ट असते. बापट हे 1995 पासून पुण्यात आमदार आहेत. पुण्याची ओळख असलेल्या कट्टा संस्कृतीचे ते पाईक आहेत. अशा कट्ट्यांवर राजकीय वैर विसरून अनेक मंडळी गप्पांसाठी एकत्र येतात. त्यामुळे साहजिकच राजकीय स्पर्धेतील वितृष्ट अशा अनौपचारीक बाबींमुळे कमी होऊन जाते.

बापट यांची पक्षविरहित मैत्री त्यामुळेच फुलली आहे. बापट यांची नगरसेवक ते मंत्रिपदापर्यंतची कारकिर्दी पाहिलेले अनेक पत्रकार पुण्यात आहेत. त्यातील काही चुकीने किंवा सवयीने अनौपचारीक चर्चेत कधी तर व्यासपीठावरही त्यांचा एकेरी उल्लेख करतात. तरीही त्याविषयी बापट यांनी कधी नाराजी व्यक्त केली नाही. उलट एकेरी उल्लेखाचा हक्क असल्याची प्रतिक्रिया त्यावर दिली. एकाद्या मंत्र्याला, "अरे गिरीश, असे म्हणणे अनेकांना खटकणारे असते. पण बापट ते मनाला लावून घेत नाहीत. 

बापट यांना भाजपपेक्षा इतर पक्षांतच जास्त मित्र असल्याने अशा मित्रांबाबत ते "मनाचा मोठे"पणा दाखवित असतात, अशी टीका त्यांच्या पक्षातील मंडळी करू शकतील. स्वपक्षातील काही आमदार मंडळींशी बापट हे कसे फटकून वागतात, याचेही किस्से काहीजण सांगतात. पुण्यातील एका वाहनतळाचे उद्‌घाटन बापट यांच्या हस्ते नुकतेच झाले. या वाहनतळासाठी भाजपचेच आमदार विजय काळे यांना निमंत्रण दिले गेले नव्हते. त्या वेळी बापट हे काळे यांचा उल्लेख करायचे कसे काय "विसरून' गेले, असा चर्चेचा विषय झाला होता. स्वपक्षातील मंडळींचे असे काही खरेखोटे अनुभव वगळले तर बापट हे सार्वजनिक कार्यक्रमांत तरी मनाचा मोठेपणा दाखवतात, हे दिसून आले आहे. त्यामुळेच सध्याच्या संकुचितपणाच्या वातावरणात तो एक दिलासा आहे. 
 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com