girish bapat on ganesh pendol | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

गणेशोत्सवात हव्या तेवढ्या कमानी उभारा : गिरीश बापटांचा ग्रीन सिग्नल

उमेश घोंगडे
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

पुणे : वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बॉक्स कमानी घालू नयेत, या पोलिसांच्या भूमिकेला डावलत गणेशोत्सवात कमानी घालण्याचा निर्णय आज पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत आज घेण्यात आला.

या निर्णयमुळे गणेशोत्सवात कमानींचे बंधन राहणार नाही. त्यामुळे मंडळांना हव्या तितक्या कमानी उभ्या करता येणार आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची नाराजी नको या भूमिकेतून नियम शिथील करण्यात आल्याचे बोलले जात आहे. 

पुणे : वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बॉक्स कमानी घालू नयेत, या पोलिसांच्या भूमिकेला डावलत गणेशोत्सवात कमानी घालण्याचा निर्णय आज पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत आज घेण्यात आला.

या निर्णयमुळे गणेशोत्सवात कमानींचे बंधन राहणार नाही. त्यामुळे मंडळांना हव्या तितक्या कमानी उभ्या करता येणार आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची नाराजी नको या भूमिकेतून नियम शिथील करण्यात आल्याचे बोलले जात आहे. 

कमानींची उंची, संख्या किती असावी याबाबत पालकमंत्री गिरीश बापट यांनी बैठकीत "ब्र'ही काढला नाही. कमानींसंदर्भात बंधनच नसल्याने उत्सवात कार्यकर्त्यांना मोकळीक मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दुसरीकडे मात्र, उत्सवात दारू पिऊन धूमाकूळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची नावे जाहीर करण्याची सूचना बापटांनी पोलिसांना केली. साऊंड सिस्टीमचाही अतिरेक न करण्याचा इशारा त्यांनी दिला. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर बापट यांच्यासमवेत महापालिका प्रशासन, पोलिस अधिकारी आणि गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक बुधवारी पुण्यात झाली. 

पालकमंत्री बापट यांनी कार्यकर्त्यांच्या तक्रारी पोलिसांपुढे मांडत काही बाबीवर मार्ग काढलाही. मात्र अनेक विषयात पालकमंत्री कार्यकर्त्यांचीच बाजू लावून धरत असल्याचे बैठकीदरम्यान दिसून येत होते. उपद्रवी कार्यकर्त्यांचा मुद्दा स्वत: उपस्थित करीत बापट यांनी त्यांना फटकारले. गणेश विसर्जन मिरवणुकीत काही कार्यकर्ते दारू पिऊन धिंगाणा घालत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे उत्सवाला गालबोट लागल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच, कार्यकर्ते आणि पोलिसांमध्येही वाद होतात. या पार्श्वभूमीवर बापटांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सबुरीचा सल्ला दिला. 

बापट म्हणाले, ""उत्सवाचे पावित्र्य राखले पाहिजे. काही मंडळे उगाचच साऊंड सिस्टिीम उभारतात. ज्यामुळे सामान्य लोकांचा प्रचंड त्रास होतो. अशा प्रकारे मंडळांनी वागू नये. ज्या मंडळांनी गेल्या वर्षी जेवढा मांडव उभारला होता, तेवढाच यंदाही उभारावा. त्यांना परवानगी दिली जाईल. त्या वेळेत मिळतील. त्यासाठी महापालिका आणि पोलिसांना काही सूचना केल्या आहे. कार्यकर्त्यांना हेलपाटे मारू देणार नाही. उत्सवातील गर्दी लक्षात घेता, मंडळांनी सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या पाहिजेत. गरजेच्या पुरत्याच किमान कमानी उभाराव्यात. त्यातून वाहतूक खोळंबणार नाही, याची काळजी घ्या,'' असा सल्लाही बापट यांनी दिला.  ही भूमिका माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केली. कमानींचा विषय कार्यकर्त्यांशी बोलताना स्पष्ट केला नाही. 
 

संबंधित लेख