क्रीडा क्षेत्रातही बापटांची `सबसे बडा खिलाडी`कडे वाटचाल!

पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुण्याचे राजकीय कारभारी झाल्यानंतर इतर क्षेत्रांतील आघाडीही सांभाळण्यास सुरवात केली आहे. त्यातही क्रीडा क्षेत्राकडे जाणीवपूर्वक लक्ष देत कलमाडींची रिक्त जागा भरण्यात ते यशस्वी ठरले आहेत. त्यामुळेच हे कारभारी आता `सबसे बडा खिलाडी` होण्याच्या मार्गावर आहेत.
क्रीडा क्षेत्रातही बापटांची `सबसे बडा खिलाडी`कडे वाटचाल!

पुणे : क्रीडा क्षेत्रावर वर्चस्व मिळवून माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी पुण्याच्या आणि राष्ट्रीय राजकारणातही आपला दबदबा निर्माण केला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील गैरव्यवहार प्रकरणानंतर कलमाडींना या दोन्ही क्षेत्रातून बाहेर पडावे लागले. ही जागा पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकारणावर आपला ठसा उमटविणाऱ्या पालकमंत्री गिरीश बापट यांनी भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे.

नामदार चषक, सीएम चषक अशा स्पर्धांच्या निमित्ताने संपूर्ण शहरभर होत असणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासोबतच कलमाडींची ओळख असणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला मागे टाकत बापट यांनी "पुणे हाफ मॅरेथॉन' चे यशस्वी संयोजन करून क्रीडा क्षेत्रात प्रवेश करीत राष्ट्रीय राजकारणात जाण्याचेही संकेत दिले आहेत. 

पुण्याचे राजकारण गेली अनेक वर्षांपासून क्रीडा क्षेत्राच्या भोवती फिरत राहिले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या सुरेश कलमाडी यांना अलगद राजकारणात ओढले आणि त्यांच्या मदतीने दिल्लीच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण केला. "इव्हेंट मॅनेजमेंट' मध्ये हातखंडा असणाऱ्या कलमाडी यांनी पुण्यात बालेवाडी क्रीडा संकुलाची उभारणी, आशियायी स्पर्धा, राष्ट्रकुल युवा स्पर्धांचे यशस्वी आयोजन करून क्रीडा क्षेत्रासोबतच राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. राजीव गांधी यांना पुण्याच्या रस्त्यावर आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या निमित्ताने रस्त्यावर उतरवून कॉंग्रेसमधील आपले स्थान अधिक बळकट केले होते. अजित पवार यांनीही राज्य कब्बडी संघटना स्वतः:च्या ताब्यात ठेवली. क्रीडा क्षेत्राचे हेच महत्त्व आता पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनाही पटले असून, त्यांनी गेल्या काही वर्षांपासून जाणीवपूर्वक क्रीडा क्षेत्रात मुसंडी मारली आहे.
 
पुण्यात सीएम चषकाच्या बरोबरीने बापट यांनी नामदार चषक स्पर्धा भरून पुण्यातील क्रीडा क्षेत्रात प्रारंभ केला.  त्यांनी "पुणे हाफ मॅरेथॉन'च्या संयोजनात भाग घेऊन क्रीडा क्षेत्रातही आपण कमी नसल्याचा प्रत्यय आज पार पडलेल्या मॅरेथॉनला मिळालेल्या प्रतिसादावरून लक्षात येते.

"पुणे हाफ मॅरेथॉन' या स्पर्धेचे महत्त्व त्यांनी अचूकरीत्या हेरले आणि पालकमंत्री या नात्याने या स्पर्धेचे पालकत्व सांभाळले. विधिमंडळाचे अधिवेशन असतानाही बापट यांनी रात्रंदिवस मॅरेथॉनच्या संयोजनासाठी खर्च केला. पुण्यात होणाऱ्या इतर मॅरेथॉन लुप्त होत असताना बापट यांनी "पुणे हाफ मॅरेथॉन'चे नेटके संयोजन करीत ही पोकळी भरून काढली. कलमाडी यांनी क्रीडा क्षेत्राला हातात धरून 25 वर्षे पुण्यातील सत्ता एकहाती सांभाळली. बापट यांनाही हे सूत्र या निमित्ताने सापडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com