girish bapat criticise cong ncp | Sarkarnama

कॉंग्रेस, राष्ट्रवादीकडून संघर्ष यात्रेचे नाटक : बापट 

सरकारनामा न्यूजब्युरो 
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

राजकारण सोडून विकासाचा विचार करणारे आम्ही असून सातारा पालिकेतील विषय हे समजुतीने घेण्याचे आहेत. आमची पुण्यात सत्ता आली. निवडणुकांनंतर आम्ही राजकारण विरहित निर्णय घेत आहोत. यापुढे साताऱ्यातही असेच होईल. 
- गिरीश बापट 

सातारा : पंधरावर्षे सत्तेत असूनही काहीही काम झाले नाही. त्यांच्या पापाचे धनी राष्ट्रवादीवाले असून यांच्या अपयशाची पावती ते भारतीय जनता पक्षावर फाडत आहेत. संघर्ष यात्रेचे नाटक करून शेतकऱ्याचे कैवारी असल्याचे भासवत नोटाबंदी, कर्जमाफीचे कारणे पुढे आणत आहेत. पण लाटेवर नाही तर विकासाच्या मुद्‌द्‌यावर राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल, असा विश्‍वास अन्न व नागरीपुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी येथे व्यक्त केला. 

पत्रकारांशी बोलताना बापट म्हणाले, पंडित दीन दयाळ उपाध्याय जन्मशताब्दी निमित्त भारतीय जनता पक्षाचे सर्व आमदार, खासदार विविध जिल्ह्यात जाऊन पक्ष विस्तार योजना राबवत आहेत. याचा पहिला टप्पा सहा ते 14 एप्रिल असा झाला. आता उर्वरित 15 दिवसांत भाजपचे प्रमुख कार्यकर्ते पक्ष विस्तारासाठी विविध गावांत जाऊन राहणार आहेत. तेथे संघटना वाढीचा कार्यक्रम राबविणार आहेत. ही योजना देशभर सुरू होतेय. काही लाख कार्यकर्ते यामध्ये सहभागी होतील. साताऱ्यातून साधारण तीनशे कार्यकर्ते सहभागी होतील. भाजपची देशभर घौडदौड सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढतोय. राज्यातील विविध निवडणुकात पक्षाने घवघवीत यश मिळविले आहे. जे आरोप करतात त्यांना जनतेने सडेतोड उत्तर दिले आहे. सातत्यपूर्ण काम, नियोजन आणि विकास हा मूलमंत्र आहे. राष्ट्रवादी व विशेषतहा अजित पवार यांना सांगू इच्छितो की त्यांचे आव्हान आम्ही स्वीकारले आहे.

आम्ही लाटेवर नाही तर विकासाच्या मुद्‌द्‌यावर स्वार होऊन पुढे चाललो आहोत. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. 
15 वर्षे ज्यांच्या हाती सत्ता होती, ते आता शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांचे राजकारण करीत आहेत. काहीही शिल्लक नाही म्हणून कर्जमाफीचा मुद्दा घेऊन संघर्ष यात्रेचे नाटक करत आहेत. शेतकऱ्यांना 35 हजार कोटींची योजना मागील वेळी केली. 5500 कोटींचा फायदा पीकविमा योजनेतून शेतकऱ्यांना झाला आहे, असे सांगून बापट म्हणाले, सबका साथ सबका विकास सुरू आहे. आमचे सरकार स्थिर असून शिवसेना आमच्या सोबतच आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी आम्ही पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करू. सरकारला कोणताही धोका नाही, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

 

संबंधित लेख