Girish Bapat and Girish Mahajan's Different opinion on Pune's Water Cut | Sarkarnama

पुणेकरांनी कुठल्या गिरीशभाऊंवर विश्वास ठेवायचा? पाणी कपात आहे म्हणणाऱ्यांवर का कपात नाही म्हणणाऱ्यांवर

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणतात पुण्यात पाणी कपात आहे, तर पालकमंत्री गिरीश बापट म्हणतात पुण्यात पाणी कपात होणार नाही. या दोन्ही मंत्र्यांच्या परस्पर विरोधी वक्तव्यांमुळे पुणेकर संभ्रमात न पडतील तरच नवल

नाशिक : राज्यभर पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वीच जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी पुण्यात यंदा पाणी कपात असेल असे सांगीतले होते. मात्र पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी याविषयी वेगळाच सुर लावला. ते म्हणाले, 'आम्ही काटकसरीने पाणी वापरतो. त्यामुळे कपात होणार नाही. सिंचन व पिण्यासाठी पाणी कमी पडणार नाही.' त्यामुळे सरकारमधील दोन मंत्री पुणे शहराच्या पाण्याविषयी भिन्न भूमिका घेत असल्याचे पुढे आले आहे. यापैकी कुठल्या गिरीशभाऊंवर विश्वास ठेवायचा, असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. 

गेल्या आठवड्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी राज्यातील पाण्याचा आढावा घेतला होता. अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात पाणी कपात करावी लागेल. पुणेकरांच्या पाण्याचे स्वतंत्र नियोजन करावे लागेल, असे त्यांनी सांगीतले होते. मात्र, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मात्र यापेक्षा वेगळी भूमिका मांडली. 

''गेल्या चार वर्षात पुण्या पाणी टंचाई झालेली नाही. यावर्षीही होणार नाही. आम्ही काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचं धोरण अवलंबले आहे. त्यामुळे पुणेकरांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी कमी पडणार नाही. पाणी कपात होण्याची शक्‍यता नाही,'' असा दावा बापट यांनी केला आहे. आता यापैकी कुणाचे म्हणणे खरे हे कोण सांगणार, असा प्रश्न पुणेकरांना पडला नाही तरच नवल. 

संबंधित लेख