Ghanshyam Shelar Upset in Shivsena | Sarkarnama

घनशाम शेलार शिवसेनेत अस्वस्थ : वेगळा निर्णय घेण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह

संजय आ. काटे
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करुन शिवसैनिक झालेले घनशाम शेलार सध्या शिवसेनेत अस्वस्थ आहेत. लोकसभा निवडणुकीत ते नगरमधून शिवसेनेचे उमेदवार असतील, असा संकेत शिवसेनेच्या किचन-कॅबिनेटमधील नेत्यांनी दिला, मात्र आता युती होण्याची शक्यता वाढल्याने शेलार यांची अस्वस्थता वाढली आहे. शेलार यांचे राजकीय भवितव्य पुन्हा अधांतरी वाटून लागल्याने कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीशी घरोबा करण्याचा दबाव त्यांच्यावर आणत असल्याची चर्चा आहे.

श्रीगोंदे (नगर) : राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करुन शिवसैनिक झालेले घनशाम शेलार सध्या शिवसेनेत अस्वस्थ आहेत. लोकसभा निवडणुकीत ते नगरमधून शिवसेनेचे उमेदवार असतील, असा संकेत शिवसेनेच्या किचन-कॅबिनेटमधील नेत्यांनी दिला, मात्र आता युती होण्याची शक्यता वाढल्याने शेलार यांची अस्वस्थता वाढली आहे. शेलार यांचे राजकीय भवितव्य पुन्हा अधांतरी वाटून लागल्याने कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीशी घरोबा करण्याचा दबाव त्यांच्यावर आणत असल्याची चर्चा आहे.

तीन वर्षांपुर्वी शेलार यांनी राष्ट्रवादीला सोडत सेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. धाडशी वक्ता व नियोजन कौशल्य असणारा नेता म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख आहे. भाजपातून १९९९ मध्ये त्यांनी अचानक शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्याकडे एसटी महामंडळाचे संचालकपद आले. ते नगर जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्षही होते. अजित पवार व त्यांचे घनिष्ठ संबध होते. मात्र त्यांनी सेनेत जाण्याचा निर्णय घेतला आणि सगळे समिकरण बदलली. शेलार यांना यापुर्वी अनेक संधी चालून आल्या, मात्र दरवेळी राजयोगाने त्यांना हुलकावणी दिली. याहीवेळी तेच होण्याची शक्यता वाढत आहे.

शेलार हे सेनेकडून लोकसभा लढवतील, असे जाहीर संकेत सेनेच्या जेष्ठनेत्यांनी नगरमध्ये दिली होती. मात्र त्यावर शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नगरच्या जाहीर सभेत भाष्य टाळले आणि शेलार समर्थकांच्या मनात धडकी भरली. शेलार याचे राजकीय पुर्नवसन सेनेत होईल, ही शंका आता खोटी ठरत असल्याने शिवसेना सोडण्यासाठी कार्यकर्ते आग्रही झाल्याचे समजते. लोकसभेत भाजपसोबत युती झाल्यास विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना उमेदवारी जर मिळाली, तर शेलार हे त्यांचे काम करु शकणार नाहीत.

त्यातच विधानसभेलाही येथील जागा भाजपाचा असल्याने शिवसेनेला थांबावे लागेल. त्यामुळे वेळीच निर्णय घेण्याची मागणी सुरु झाली आहे. काही कार्यकर्त्यांनी शेलार यांच्याकडे पुन्हा राष्ट्रवादीत चला असा सुरु लावल्याचे समजले. याबद्दल शेलार यांना विचारले असता, त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला मात्र काहीतरी प्रतिक्रिया असे सांगितल्यावर त्यांनी 'थोडे थांबा' असे सूचक संकेत दिले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख