george-
george-

एका इशाऱ्यावर मुंबई बंद करणारया जॉर्ज फर्नांडिसांचे मुंबईत घर नव्हते  

खरे तर मस्त फकीर होते ते एका अर्थाने. संघटना बांधायची. आंदोलने करायची, जवळ असेल त्या मित्राकडे पथारी लावायची.

मुंबई :  मुंबई तेंव्हा वेगळीच होती, सर्वदूर अन्यायाची छाया पण त्यावर मात करणारी आंदोलनाची हवा. हजारो मुंबईकरांना न्याय मिळावा यासाठी झगडणारे कितीतरी. त्यांचे नेतेही तितकेच. नेत्यांच्या या भाउगर्दीतला आमचा माणूस म्हणजे जॉर्ज. तो बंगलोरकडचा, माझे वडिलही तिकडचेच ...

मुंबई टॅक्‍सी युनियनचे नेते ए. एल. क्‍वाड्रोस आठवणी सांगत होते. "मुंबई बंद'चा सम्राट असलेल्या जॉर्जच्या आठवणी सांगताना दाटून आलेला कंठ सावरत ते पार भूतकाळात 1960 सालात गेले होते. मुंबई त्या काळीही धावायची टॅक्‍सीवर. पण त्यांना न्याय देणारे कुणी नव्हते. खरे तर टॅक्‍सीवाले अनाथ होते. पेट्रोल डिझेल दरवाढ व्हायची पण त्याचा कोणताही लाभ आम्हा टॅक्‍सीचालकांना व्हायचा नाही. जॉर्ज त्यात शिरले. ते आमच्या हक्‍कांसाठी भांडत राहिले. मग मात्र आमची संघटना आकार घेवू लागली.1962 साली परमिटससाठी लढा सुरू झाला.

 परवान्यांचे नूतनीकरण होत नव्हते. 10 पैसे दर वाढवा अशीही मागणी होती. जॉर्जसाहेबांचे नेतृत्व त्या काळात तळपत होते, शिवाजी पार्कवर आम्ही ठिय्या देवून बसलो होतो. मागणी केवळ 10 पैशांची होती, त्यासाठी साहेबांना थेट तुरूंगवास सुनावला गेला, तोही राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवून. पण जॉर्ज कायम तळपती तलवार राहिले.

 खरे तर मस्त फकीर होते ते एका अर्थाने. संघटना बांधायची. आंदोलने करायची, जवळ असेल त्या मित्राकडे पथारी लावायची. मुंबई हळुहळू जॉर्ज यांच्या शब्दानुसार वागू लागली. ते घरचे बडे आहेत असे सांगितले जायचे पण प्रत्यक्षात त्यांच्याकडे जे काय होते त्याचा त्यांनी ट्रस्ट बनवला होता. सगळे आयुष्यच वाहिलेले असायचे कामाला. 

त्यांना भेटायचे कुठे असा प्रश्‍न पडू लागला, मग आम्ही बॉम्बे लेबर युनियनच्या नावाने गोवालिया टॅंक परिसरात एक गाळा घेतला. जॉर्जसाहेबांच्या वादळी दिवसातले त्यांचे हे निवासस्थान. मुंबई तेथील एका इशाऱ्यावर बंद पडत असे. 1967 सालानंतर जॉर्जसाहेबांची पावले दिल्लीकडे पडू लागली. ते राष्ट्रीय पातळीवर चमकू लागले मग त्यांच्यासाठी राखीव असलेल्या त्या घरात युनियनचे काम सुरू झाले.

जॉर्ज आमच्यासाठी काय होते ते सांगणे कठिण आहे, ते खरे तर सर्वस्व होते आमचे. मुंबईतल्या सामान्य माणसाच्या लढ्याला आकार देण्याची त्यांची क्षमता वादातीत होती. नंतर ते केंद्रातही तळपले. त्यांच्या अनेक अभ्यासू निर्णयांमुळे कामगारांचे, मुंबईचे भले तर झालेच पण संरक्षणमंत्री या नात्याने त्यांची कारकिर्दही उत्तम राहिली. सुमारे तीन वर्षांपूर्वी त्यांना भेटायला गेलो दिल्लीत, आजाराने ग्रस्त असलेल्या या नेत्याला बघवत नव्हते. आज हा लढा अखेर संपला. मुंबईच्या इतिहासात जॉर्ज अजरामर रहातील, असे नमूद करत भावोत्कट झालेले क्‍वाड्रोस  बोलता बोलता शून्यात हरवले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com