गौरी लंकेश यांची भररस्त्यात हत्या होते हे कशाचे लक्षण ? उद्धव ठाकरेंचा सवाल 

 गौरी लंकेश यांची भररस्त्यात हत्या होते हे कशाचे लक्षण ? उद्धव ठाकरेंचा सवाल 

मुंबई : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा फक्त निषेध आणि धिक्कार करून चालणार नाही. जे लोक आपल्या विचाराचे नाहीत व आपल्या भूमिकेचे समर्थन करीत नाहीत अशा लोकांचा आवाज कायमचा बंद करणारी एखादी यंत्रणा पोलादी भिंतीमागे अदृश्‍यपणे काम करीत आहे काय ? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. 


"गौरी लंकेशची हत्या" या मथळ्याखाली सामनाने लेख प्रसिद्ध करून या हत्येचा निषेध केला आहे. 

उद्धव ठाकरे लिहतात, " एका निःशस्त्र महिला पत्रकाराची हत्या बंगळुरूच्या भररस्त्यावर झाली आहे. लंकेश या महिला पत्रकारावर काही अज्ञात तरुणांनी गोळ्या झाडल्या व ते पसार झाले. एक निःशस्त्र महिला रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली. तिचे विचार व भूमिका कदाचित कुणाला पटत नसतील. तिच्या लिखाणाने व भूमिकेने कुणी अस्वस्थ झाले असतील, म्हणून त्या निःशस्त्र महिलेवर अशाप्रकारे निर्घृण हल्ला करणे हे अमानुष आहे. मानवता व देशाच्या इभ्रतीस कलंक लावणारे आहे. हे शौर्य नाही व मर्दानगीचा जयही नाही. हिंदुस्थानच्या संरक्षणमंत्री पदावर एका महिलेची नियुक्ती झाली म्हणून एका बाजूला आनंदाने टाळ्या वाजवीत असतानाच त्याच हिंदुस्थानच्या भररस्त्यावर एका महिला पत्रकाराची हत्या व्हावी हे कसले लक्षण समजायचे ? 

" गोरक्षकांच्या उन्मादावर स्वतः पंतप्रधान मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे. या देशात कोणी काय खायचे यावरून वादंग आणि हिंसा सुरू आहे व त्यात अनेकजण नाहक प्राणास मुकले आहेत. शिवसेनेचा पराभव करा व भाजपला विजयी करा, असे जाहीर सभांतून सांगणारे तथाकथित जैन मुनी एकप्रकारे हिंसेचेच समर्थन करतात व राज्यकर्त्या पक्षांचे लोक त्यांच्या चरणावर डोके ठेवतात. मांसाहार करणाऱ्यांना मुंबईत घर नाकारायचे व त्यांची आर्थिक कोंडी करायची. हे कोणत्या शांती व अहिंसेत बसते ? असा सवालही ठाकरे यांनी केला आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com