Gauardian Minister Deepak sawant visits late Kakasaheb Shinde's brother | Sarkarnama

पालकमंत्री डॉ. दिपक सांवत अडीच महिन्यांनी शहरात, पण कुणालाच खबर नाही 

सरकारनामा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

आरोग्यमंत्री असलेल्या सांवत यांच्याकडे औरंगाबाद जिल्ह्याचे पालकत्व देखील सोपवण्यात आले होते. पण राजीनामा दिल्यानंतर ते अडीच महिन्यात औरंगाबादला फिरकले नव्हते.  

औरंगाबादः जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत बुधवारी   अडीच महिन्यांनी शहरात आले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बलिदान देणाऱ्या स्व. काकासाहेब शिंदे, प्रमोद पाटील यांच्या कुटुंबाची भेट घेऊन काही तासांतच त्यांनी पुन्हा मुंबई गाठली.

विशेष म्हणजे त्यांच्या या दौऱ्याची कुणालाच खबर नव्हती, की त्यांचा शासकीय दौरा देखील नव्हता. त्यामुळे त्यांच्या अचनाक येण्या आणि जाण्याबद्दल चर्चेला उधाण आले आहे. 

मुंबई पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी देतांना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी डॉ. दिपक सावंत यांना डावलल्यापासून ते नाराज असल्याची राजकीय वर्तुळात सुरू होती. उमेदवारी न मिळाल्याच्या नाराजीतूनच सावंत यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा उध्दव ठाकरे यांच्याकडे सोपवला होता.

पण काल अचनाक सायंकळी पाचच्या विमानाने डॉ.दिपक सांवत शहरात दाखल झाले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले आणि त्यांना थेट स्व. काकासाहेब शिंदे, प्रमोद पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी घेऊन गेले. यावेळी राज्यमंत्री अर्जून खोतकर देखील त्यांच्या सोबत होते. या दोन्ही कुटुंबियाची भेट घेऊन सात्वंन केल्यांनतर पुन्हा रात्रीच्या विमानाने डॉ.दिपक सांवत मुंबईला परतले. 

विशेष म्हणजे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे वगळता शिवसेनेच्या इतर कुठल्याही पदाधिकाऱ्यांना सांवत यांच्या दौऱ्याची कल्पना नव्हती. जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुण आत्महत्या करत असतांना पालकमंत्री कुठे आहेत अशी टिका होऊ शकते आणि ती टाळण्यासाठीच डॉ. दिपक सावंत यांचा हा गुपचूप धावता दौरा आयोजित करण्यात आला होता असे बोलले जाते. मंत्र्यांच्या शासकीय दौऱ्याची माहिती देणारे जिल्हा माहिती कार्यालय देखील डॉ. सांवत यांच्या या दौऱ्यापासून अनभिज्ञ होते. 

मे महिन्यात औरंगाबादेत जातीय दंगल उसळल्यानंतर पाहणीसाठी डॉ. दिपक सावंत शहरात आले होते. त्यानंतर मात्र मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे ते शहरात आलेच नव्हते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख