Garden on the Banks of Mithi River | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

मिठी नदीच्या बाजूला "मॉर्निंग वॉक'! - महापालिका बांधणार उद्यान

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 29 मे 2017

मिठी नदीच्या विकासाची घोषणा अनेक वर्षांपासून होत आहे. आतापर्यंत पालिकेने फक्त परिसरातील अतिक्रमणे हटवून रुंदीकरण केले आहे. पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी किनाऱ्यावर संरक्षक भिंत उभारली आहे. किनाऱ्यावर उद्यान तयार केल्यावर नदीच्या प्रदूषणालाही आळा बसेल, असा महापालिकेला विश्‍वास आहे.

मुंबई - नाक मुठीत धरायला लावणाऱ्या मिठी नदीच्या बाजूला लवकरच सकाळ-संध्याकाळी मनसोक्त फेरफटका मारता येणार आहे. कुर्ला येथील क्रांतिनगरपासून स्मशानभूमीपर्यंत मिठी नदीच्या बाजूला उद्यान तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका तीन कोटींचा खर्च करणार आहे.

परदेशात नद्या हे तिथल्या शहरांचे वैभव असते; मात्र मुंबईतील नद्या सध्या नाले म्हणून ओळखल्या जातात. लवकरच ही परिस्थिती बदलण्याची शक्‍यता आहे. मिठी नदीच्या रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, या संपूर्ण नदीच्या किनाऱ्यावर उद्यान तयार करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात कुर्ल्यातील क्रांतिनगरपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी दोन कोटी 94 लाखांचा खर्च करण्यात येणार आहे. याविषयीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे. जसजशी जमीन मिळत जाईल तसतसा किनाऱ्याचा विकास करण्यात येईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

मिठी नदीच्या विकासाची घोषणा अनेक वर्षांपासून होत आहे. आतापर्यंत पालिकेने फक्त परिसरातील अतिक्रमणे हटवून रुंदीकरण केले आहे. पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी किनाऱ्यावर संरक्षक भिंत उभारली आहे. किनाऱ्यावर उद्यान तयार केल्यावर नदीच्या प्रदूषणालाही आळा बसेल, असा महापालिकेला विश्‍वास आहे.

सांडपाण्यावर होणार प्रक्रिया
मिठी नदीत येणारे सांडपाणी हे महापालिकेपुढील मोठे आव्हान आहे. नाले, तसेच परिसरातील झोपड्यांमधील शौचालयांचे पाणी थेट नदीत सोडले जाते. त्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. यावर पालिकेने उपाय शोधून काढला आहे. नदीत येणाऱ्या सांडपाण्यावर तीन टप्प्यांत प्रक्रिया करण्यात येईल. यासाठी अर्थसंकल्पात 25 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मिठी नदीच्या उगमापासून तीन किलोमीटरपर्यंतच्या सांडपाण्यावर पवई येथील पाणीपुरवठा प्रकल्पात प्रक्रिया करण्यात येईल. साकीनाका येथील प्रक्रिया केंद्रात दररोज 44 दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया होईल. माहीमपासून धारावीपर्यंतच्या प्रवाहातील पाण्यावर वांद्रे येथे प्रक्रिया करण्यात येईल.

उद्यानाजवळ कचराकुंडी
घरातील कचरा नागरिक नाल्यात भिरकावतात. मिठी नदीत असा कचरा टाकला जाऊ नये, यासाठी किनाऱ्याच्या बाजूला तयार केलेल्या उद्यानाजवळ ठराविक अंतरावर कचराकुंड्या ठेवण्यात येतील. पदपथ तयार करणे, हिरवळ तयार करणे; तसेच हे काम पूर्ण झाल्यावर वर्षभर उद्यानाची देखभाल ठेवण्याची जबाबदारीही कंत्राटदाराची असेल

संबंधित लेख