Ganpatrao Deshmukh's Punctuality | Sarkarnama

गणपतरावांचा वक्तशीरपणा भावला आर. आर. आबांच्या पूत्राला

संपत मोरे
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

दिलेल्या वेळेत  पोहोचणारे नेते हाताच्या बोटांवर मोजण्या एवढेच. ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख ही अशीच एक व्यक्ती. वेळेत नाही तर वेळेपूर्वी पोहोचणं हा त्यांचा रिवाज. वयाच्या 91 व्या वर्षीही हा रिवाज चुकलेला नाही, त्यांच्या या वक्तशीरपणाचा अनुभव नुकताच आला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री (कै.) आर. आर. पाटील यांचे सुपूत्र रोहित पाटील यांना

पुणे - दिलेल्या वेळेत  पोहोचणारे नेते हाताच्या बोटांवर मोजण्या एवढेच. ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख ही अशीच एक व्यक्ती. वेळेत नाही तर वेळेपूर्वी पोहोचणं हा त्यांचा रिवाज. वयाच्या 91 व्या वर्षीही हा रिवाज चुकलेला नाही, त्यांच्या या वक्तशीरपणाचा अनुभव नुकताच आला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री (कै.) आर. आर. पाटील यांचे सुपूत्र रोहित पाटील यांना. 'सरकारनामा'शी बोलताना त्यांना हा अनुभव सांगितला. 

आमदार गणपतराव आबा देशमुख यांना कधी जवळून पाहिलं नव्हतं. त्यांच्याबद्दल खूप काही ऐकलं होतं. आम्ही गेल्या आठवड्यात  आरोग्य शिबिराच्या उद्घाटनाला आबांना कवठेमंहकाळला बोलावलं. येण्याचं मान्य करताना आबा आम्हाला म्हणाले 'मला अर्ध्या तासात सोडा'.आम्ही हो म्हणालो. आम्ही आबांना वेळ दिली होती नऊची पण आबा साडेआठ वाजताच  कवठेमहंकाळ मध्ये आले.......माजी उपमुख्यमंत्री (कै) आर. आर. पाटील यांचे सुपूत्र रोहित पाटील सांगत होते.

''९१वर्षाचा हा माणूस एवढा प्रवास करून वेळेच्या अगोदर येतो याच मला आश्चर्य वाटलं. आबाचा वक्तशीरपणा आम्हा तरुणांना खूप काही शिकवून गेला. आबांसारखी माणसं आपल्या एका कृतीतून आमच्यासारख्या युवकांना शिकवत असतात आणि त्यांचं आयुष्य हा समाजासाठी ग्रंथ असतो." रोहित पाटील यांनी आवर्जून नमूद केलं. 

ते म्हणाले, "आर. आर. आबा पाटील दरवर्षी एक मेगा आरोग्य शिबिर घ्यायचे. आबांच्या नंतर ते बंद झालं होतं. यावर्षी आम्ही पुन्हा ते शिबिर सुरु केलं आहे. या शिबिराचे अध्यक्ष म्हणून आम्ही गणपतराव आबांना निमंत्रण दिले. ते लगेच यायला तयार झाले. फक्त त्यांनी मी अर्धा तास वेळ देऊ शकतो. कारण मला त्यादिवशी इतर कार्यक्रम आहेत असं सांगितलं. त्यादिवशी आम्ही आबांना नऊ वाजेपर्यंत या असं सांगितलं होतं. पण सकाळी साडेआठ वाजताच आबांचा आलोय म्हणून निरोप आला. आम्हाला एक सुखद धक्काच बसला. आणि त्यांच्या वक्तशीरपणाचा आदर वाटायला लागला.''

''पहिल्यादा उदघाटनाचे भाषण झाल्यावर आबा मला म्हणाले 'रोहित, मला जायला परवानगी देताय का?' महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि समाजकारणातील एवढा मोठा माणूस माझ्यासारख्या त्यांच्या नातवाच्या वयाच्या छोट्या मुलाला परवानगी मागत होते. त्यांचा तो विनम्रपणा पाहून मी दबून गेलो. नतमस्तक झालो. त्यादिवशी खूप थोडा वेळ आबा आमच्यासोबत होते पण त्या वेळातच खूप काही शिकवून गेले. आर आर आबांच्या प्रेमापोटी या वयातही आबा एवढा दूरचा प्रवास करून आले होते. आमच्या कुटुंबावर असलेलं त्यांचं प्रेम पाहून मला भरून आलं." असं रोहित पाटील यांनी शेवटी सांगितले. 

संबंधित लेख