ganpatrao deshmukh | Sarkarnama

शेती सुधारत नाही, मग महाराष्ट्राचा विकास कसला ? : गणपतराव देशमुख

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 26 एप्रिल 2017

भारती विद्यापीठाने दिलेला जीवनसाधना गौरव पुरस्कार माझा वैयक्‍तिक नाही. गेली 50 वर्षे निवडून देवून विधिमंडळात पाठवणाऱ्या सांगोला तालुक्‍यातील जनतेचा, कार्यकर्त्यांचा हा सन्मान आहे. - गणपतराव देशमुख, आमदार

पुणे : "शेतीची अवस्था सुधारत नाही. उत्पादन खर्चावर आधारित शेतीमालाला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होत नाहीत. या परिस्थितीत महाराष्ट्राचा विकास झाला, असे कोणी म्हणत असेलतर मी त्यांच्याशी सहमत नाही,' असे मत ज्येष्ठ नेते, सांगोला मतदारसंघातील शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांनी व्यक्‍त केले. 

भारती विद्यापीठाच्या स्थापना दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. पतंगराव कदम यांच्याहस्ते देशमुख यांना जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देशमुख म्हणाले,"सांगोलासारख्या दुष्काळी भागात पाच वर्षातून तीन वर्ष दुष्काळ असतो. प्रत्येकी वर्षी 8 ते 10 महिने मोठे स्थलांतर होते.
ऊसतोडणी कामगारांची संख्या मोठी आहे. या भागाच्या विकासासाठी दुष्काळ निर्मूलन हाच पर्याय आहे. या प्रश्‍नांवर लढा उभारला. आजवरच्या कारकिर्दीत साडेतीन वर्षाचा कार्यकाल सोडला तर कायम मी विरोधी पक्षाचा आमदार म्हणून काम केले. विधिमंडळात शोषित, वंचित वर्गाचे प्रश्‍न मांडले.' 

पतंगराव कदम यांनी मोठ्या कष्टाने भारती विद्यापीठ उभा केल्याचे नमूद करून देशमुख म्हणाले की, एका लहानशा खोलीत त्यांनी संस्था सुरू केली. शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक शंकरराव मोरे यांच्या नावाने पहिली माध्यमिक शाळा सुरू केली. या संस्थेचा आज वटवृक्ष झाला आहे. 

साहित्यिक द. मा. मिरासदार, डॉ. विनोद शहा, डॉ. एस. एफ. पाटील यांचाही यावेळी जीवनगौरव साधना पुरस्काराने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्‍वजित कदम उपस्थित होते. 

संबंधित लेख