ganeshotasav and institutions | Sarkarnama

आता शाळा-महाविद्यालयातील गणेशोत्सवदेखील थांबवणार का ?

उमेश घोंगडे
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

पुणे : पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने केलेल्या सत्यनारायण पूजेवरून माध्यमांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून चर्चा सुरू झाली आहे. शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक उपक्रम करू नयेत, अशी भूमिका मांडली जात आहे. त्यासाठी शासकीय जीआर व घटनेचे दाखले देण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर शाळा-महाविद्यालयात आता दहीहंडी, गणेशोत्सवासारखे उत्सव साजरे करण्यास मज्जाव करणार का ? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

राज्यातील कोणत्याही शाळा-महाविद्यालयात वर्षानुवर्षे गणेशोत्सव साजरा होतो. ग्रामीण भागातील छोट्यातील छोट्या गावातील शाळांमध्ये दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. विशेष म्हणजे कोणतीही जात, धर्म या उत्सवाला अडसर येत नाही. गणेश विसर्जन मिरवणूकदेखील तितक्‍याच उत्साहात काढली जाते. सारेच या उत्सवात सहभागी होतात. आता सुरू झालेल्या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर शाळांमधील गणपती उत्सव थांबविण्याची मागणी संबंधित संस्था करणार का ? अशीही चर्चा सुरू झाली आहे. 

फर्ग्युसन महाविद्यालयातील सत्यनारायण पूजेवरून चर्चा सुरू असली तरी ही पूजा महाविद्यालय अथवा संस्थेच्या प्रशासनाने केलेली नव्हती तर महाविद्यालयातील सेवकवर्गाने एकत्र येऊन केल्याचे सांगण्यात येत आहे. संस्थेत वर्षानुवर्षे कर्मचाऱ्यांकडून पूजा घातली जाते, असेही सांगण्यात आले. सरकारी नियमावलीत कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने असे उपक्रम करू नयेत, असे कुठेही म्हटले नाही. संस्था अथवा महाविद्यालयांनी उपक्रम करू नयेत याचा उल्लेख नियमावलीत आहे. या संदर्भात नॅशनल स्टुडन्टस युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) या विद्यार्थी संघटनेने घेतलेली भूमिका विवेकी आहे. केवळ सत्यनारायण पूजा केली म्हणून कोणत्याही संस्थेला धार्मिक रंग देणे योग्य नसल्याची अत्यंत विवेकी भूमिका या विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख यांनी मांडली आहे. 

सत्यनारायण कथेच्या सत्यतेबद्दल अनेक आक्षेप घेता येतील. त्यावर स्वतंत्र चर्चा होऊ शकेल. मात्र एखाद्याला आपली धार्मिक भावना जपण्याच्या घटनेच्या मूलभूत आधिकारावर गदा आणता येणार नाही, हे या संदर्भाने लक्षात घेतले पाहिजे. 

संबंधित लेख