उमरग्यात झळकले "गायकवाडगिरी'चे पोस्टर्स?

उमरग्यात झळकले "गायकवाडगिरी'चे पोस्टर्स?

उमरगा - पुणे-दिल्ली विमान प्रवासा दरम्यान एअर इंडियाच्या कर्मच्याऱ्यास मोजून 25 वेळा सॅन्डलने मारल्यामुळे उस्मानाबादचे शिवसेना खासदार प्रा. रविंद्र गायकवाड गल्ली ते दिल्लीपर्यंत चर्चेचा विषय ठरले आहेत. झालेल्या प्रकाराबद्दल संसदेत दिलगिरी व्यक्त केल्यानंतर गायकवाड यांच्यावरील विमान प्रवासबंदी एअर इंडियाने उठवण्याचा निर्णय घेतला. ही विमान प्रवास बंदी उठवण्यासाठी शिवसेनेला बरीच मेहनत घ्यावी लागली. आता बंदी उठवल्यानंतर खासदार गायकवाड यांच्या स्वागतासाठी उमरग्यात शिवसैनिकांकडून जोरदार तयारी सुरु आहे. त्यासाठी शहरात जागोजागी फ्लेक्‍स लावण्यात आले आहेत. यापैकी "गायकवाडगिरी' अशा कॅच लाईनसह लावण्यात आलेले पोर्स्टर सध्या चर्चेचा विषय बनले आहे.

विमान प्रवासात एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला केलेली मारहाण खासदार गायकवाड व त्यांच्या शिवसेना पक्षाला चांगलीच महागात पडली. रविंद्र गायकवाड यांच्या विरोधात दिल्ली पोलीसांनी दाखल केलेला गुन्हा व लादलेली विमान प्रवासबंदी यातून एअर इंडियाने देखील शिवसेनेशी पंगा घेण्याचा निर्धार केल्याचे स्पष्ट झाले होते. गायकवाड यांची कृती चूकीची असल्याचे मान्य करुन देखील शिवसेना त्यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहीली. दोन आठवड्याचा लढा, मुंबईतून एकाही विमानाचे उड्डाण होऊ देणार नाही, या शिवाय एनडीएच्या स्नेहभोजनावर बहिष्कार टाकण्याची शिवसेनेने दिलेली धमकी अखेर कामी आली. संसंदेचे अधिवेशन संपता संपता खासदार गायकवाड यांच्यावरील विमान प्रवासबंदी नाट्यावर अखेर पडदा पडला.

झिरो टू हिरो
खासदार रविंद्र गायकवाड यांनी विमान प्रवासात एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला केलेली मारहाण आणि प्रसार माध्यमांसमोर त्याची दिलेली कबुला यावरुन त्यांच्यावर देशभरातून टीकेची झोड उठली होती. चोहोबाजूनी होणाऱ्या टिकेमुळे गायकवाड हे व्हिलन ठरले होते. विमान कंपन्यांच्या बंदीमुळे त्यांना तीन आठवड्यांपासून आपल्या घरी उमरग्याला येता आले नाही. कधी रेल्वेने तर कधी चार्टड प्लेनमधून मुंबई-दिल्ली प्रवास करत गायकवाड यांनी मिडियाचा फोकस आपल्यावर ठेवला. संसदेत त्यांनी केलेले निवदेन, त्यांच्या समर्थनार्थ ठामपणे उभी राहिलेली शिवसेना, संसेदेतील राडा, नागरी उड्डयणमंत्र्यांना झालेली धक्काबुकी आणि अखेर उठवण्यात आलेली विमान प्रवासबंदी यामुळे खासदार गायकवाड झिरो टू हिरो ठरले.

सत्याचा विजय, गायकवाडगिरीने लक्ष वेधले
विमान प्रवासबंदी उठवल्यानंतर खासदार गायकवाड यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतल्यानंतर ते आता आपल्या उमरग्यातील घरी जाणार आहेत. विमान प्रवास बंदीमुळे त्यांना गुढीपाडव्याचा सण कुटुंबियांसोबत साजरा करता आला नव्हता. त्यामुळे उमरगावासिय आपल्या खासदाराची आतुरतेने वाट पाहत आहेत. शहरात त्यांच्या स्वागतासाठी जागोजागी कमानी लावण्यात आल्या आहेत. याशिवाय "सत्याचा विजय, गायकवाडगिरी अशी स्तुती सुमने उधळणारी पोस्टर्स झळकली आहेत. या पोस्टर संदर्भात शिवसैनिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींच्या मते गायकवाडगिरीची पोस्टर्स लावणे योग्य नाही, ती काढून टाकावीत, तर एअर इंडियाची मुजोरी शिवसेनेने मोडीत काढल्यामुळे अशा बॅनरबाजीत काही गैर नाही असे दोन मतप्रवाह आहेत.

विमान प्रवासबंदी उठवण्यात आली असली तरी गायकवाड यांच्यावर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार अद्याप कायम आहे. त्यात "गायकवाडगिरी' सारख्या पोस्टर्सची भर नको असे म्हणत हे पोस्टर काढण्यात आल्याची माहिती आहे. 12 किंवा 13 एप्रिल रोजी खासदार गायकवाड उमरग्यात येण्याची शक्‍यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com