gadkari view on satara highway | Sarkarnama

पुणे-सातारा रस्ता : गडकरींच्या घोषणा ठरल्या पोकळ! 

उमेश घोंगडे 
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

सार्वजनिक बांधकामांच्या कामातील गुणवत्ता व काम वेळेत पूर्ण करण्याबाबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी फारच आग्रही असतात. काम पूर्ण करण्याची "डेडलाइन' पाळली नाही तर "ब्लॅक लिस्ट' करू अशी धमकीदेखील ते सार्वजनिक कार्यक्रमात वारंवार देतात. मात्र, तब्बल सात वर्षे सुरू असलेल्या पुणे सातारा रस्त्याच्या कामात लक्ष घालायला गडकरींना वेळ नाही की काय, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. 

पुणे: सार्वजनिक बांधकामांच्या कामातील गुणवत्ता व काम वेळेत पूर्ण करण्याबाबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी फारच आग्रही असतात. काम पूर्ण करण्याची "डेडलाइन' पाळली नाही तर "ब्लॅक लिस्ट' करू अशी धमकीदेखील ते सार्वजनिक कार्यक्रमात वारंवार देतात. मात्र, तब्बल सात वर्षे सुरू असलेल्या पुणे सातारा रस्त्याच्या कामात लक्ष घालायला गडकरींना वेळ नाही की काय, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. 

देहूरोड ते सातारा या 140 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम एक ऑक्‍टोबर 2010 रोजी सुरू झाले. निविदेप्रमाणे हे काम 31 मार्च 2013 रोजी पूर्ण होणे अपेक्षित होते. या काळात केवळ 40 टक्के काम पूर्ण झाले. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला पुन्हा 31 डिसेंबर 2015 पर्यंतची मुदत देण्यात आली. या काळात आणखी केवळ 20 टक्के काम पूर्ण झाले. आता काम पूर्ण करण्यासाठी या वर्षअखेरची मुदत मागण्यात आली आहे. विशेष म्हणजे इतक्‍या वर्षात कंत्राटदाराला केवळ मुदत वाढ देण्यात आली. आताही मुदतवाढ देण्याची चर्चा सुरूच आहे. एका बाजूला रोज नव्या रस्त्याच्या कामाची घोषणा करणारे गडकरी सातारा रस्त्याच्या कामाकडे इतके दुर्लक्ष का करताहेत, हे कळायला मार्ग नाही. संबंधित कंत्राटदाराच्या विरोधात सातारा व पुणे जिल्ह्यातून अनेक तक्रारी झाल्या आहेत. मात्र अद्याप कसलाच फरक पडत नाही. या तक्रारींची कुणी दखलही घेत नाही. देशातील एका महत्वाच्या महामार्गाची गेले सात वर्षे सुरू असलेली दूरवस्था इतक्‍या कार्यक्षम गडकरींना दिसत नाही का असा प्रश्‍न विचारतानाच नागपूरबाबत असा गलथानपणा त्यांनी सहन केला असता का, असाही सवाल करण्यात येत आहे. 
 

संबंधित लेख