Gadkari birthday function | Sarkarnama

गडकरींच्या वाढदिवसावर दिल्लीची नजर? 

सुरेश भुसारी/ गोविंद तुपे
रविवार, 28 मे 2017

: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्यावर दिल्लीची नजर होती काय, अशी कुजबुज आता सुरू झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मारलेली दांडी, श्री श्री रविशंकर यांची गैरहजेरी व अनेक मुख्यमंत्र्यांनी येण्यास दाखविलेल्या असमर्थतेमुळे या कुजबुजीला विशेष अर्थ प्राप्त झाला आहे. 

नागपूर/मुंबई : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्यावर दिल्लीची नजर होती काय, अशी कुजबुज आता सुरू झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मारलेली दांडी, श्री श्री रविशंकर यांची गैरहजेरी व अनेक मुख्यमंत्र्यांनी येण्यास दाखविलेल्या असमर्थतेमुळे या कुजबुजीला विशेष अर्थ प्राप्त झाला आहे. 

गडकरी यांच्या षष्ठ्यद्बिपूर्तीचा सोहळा मोठ्या उत्साहात नागपुरात साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमित शाह राहणार होते. त्यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविण्याचे मान्य केले होते. परंतु अखेरीस ते नागपूरकडे वळले नाहीत. श्री श्री रविशंकर यांनाही येता आले नाही. गडकरींच्या सत्कार सोहळ्याला केवळ मध्यप्रदेश मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान व छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमणसिंग उपस्थित राहिले. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे शनिवारला नागपुरात आल्या. त्यांनी गडकरींच्या घरी जाऊन अभिष्टचिंतन केले. परंतु त्या कार्यक्रमाला हजर राहिल्या नाहीत. मनोहर पर्रीकर यांना गोव्याचे मुख्यमंत्री करण्यात गडकरींनी मोठी भूमिका बजावली. परंतु त्यांनीही गडकरींच्या या सत्कार सोहळ्याला येण्याचे टाळले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या आयोजन समितीचे प्रमुख होते. 

राज्यात शेतकरी आत्महत्या करीत असताना असा वाढदिवसाचा दिमाखदार सोहळा करणे म्हणजे विरोधकांच्या हातात आयते कोलित देण्याचा प्रकार आहे. त्यामुळे वाढदिवसाचा जंगी सोहळा करण्याऐवजी शक्‍य तितक्‍या साध्या पध्दतीने वाढदिवस साजरा करण्याचा सल्ला दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी गडकरींना दिल्याचे समजते. या सल्ल्यानंतरच सोहळ्यासाठी करण्यात आलेली शाही सजावट कमी करण्यात आली. 

गडकरींच्या एकसष्टीच्या कार्यक्रमासाठी लाल किल्ल्याची प्रतिकृती बनविली जाणार होती. एवढच नाही तर स्टेजच्या दोन्ही बाजूला दोन उड्डान पूलांच्या प्रतिकृती आणि एक मोठे दिमाखदार जहाजही उभारण्यात येणार होते. मात्र हा भव्य सोहळा साधेपणाणे करण्याच्या सूचना दिल्लीतून येताच काही तासातच्या या स्टेजचा अर्धवट स्वरूपात बनविण्यात आलेला लूक बदलण्यात आल्याची माहिती विश्‍वसनीय सुत्रांनी दिली. विशेष म्हणजे उड्डाणपूल, जहाज आणि लालकिल्याच्या प्रतिकृतीचे अर्धवट सांगाडे हाटवून त्याठिकाणी दोन मोठे बॅनर लावून कार्यक्रमाला सुरूवात झाली आहे. 

 

संबंधित लेख