विरोधकांच्या खोट्या आरोपांना आक्रमकपणे उत्तर द्या, गडकरींचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन 

विरोधकांच्या खोट्या आरोपांना आक्रमकपणे उत्तर द्या, गडकरींचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन 

मुंबई : आपले सरकार पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त असून भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर द्यावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री व भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आज केले. 

भाजपच्या प्रदेश कार्यसमितीची बैठक बांद्रा येथे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. बैठकीचे उद्‌घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी गडकरींनी आपल्या नेहमीच्याच शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. 

गडकरी म्हणाले, ""अटलजी यांच्यासह कार्यकर्त्यांनी केलेला त्याग, परिश्रम व समर्पणामुळे पक्ष देशात सत्ताधारी बनला. भाजपला देशाचे भवितव्य घडविण्याची संधी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गाव, गरीब, किसान यांचा विकास करण्याबरोबरच पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात जबरदस्त कामगिरी केली आहे. भाजपच्या केंद्र व राज्य सरकारचे विकासाचे काम विरोधकांना सहन होत नाही, त्यामुळेच ते जातीयवाद वाढविण्याचा व विकासाचा अजेंडा बदलण्याचा प्रयत्न करत आहेत.'' 

राफेल विमानांच्या खरेदीवरून कॉंग्रेस पक्ष आरोप करत आहे, पण रिलायन्सबरोबर राफेल विमान बनविणाऱ्या कंपनीचा करार कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असतानाच झाला होता. या कंपनीने रिलायन्सप्रमाणेच सुट्या भागांसाठी 22 कंपन्यांशी करार केला आहे. या करारांशी भाजप सरकारचा काहीही संबंध नाही. मोदी सरकारने यशस्वी वाटाघाटी केल्यामुळे सुसज्ज लढाऊ विमाने चाळीस टक्के स्वस्त मिळाली आहेत. या विषयातील सर्व माहिती घेऊन भाजप कार्यकर्त्यांनी अत्यंत आक्रमकपणे आरोप खोडून काढावेत असेही ते म्हणाले. 

यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजप राष्ट्रीय सहसंघटनमंत्री वी. सतीशजी, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजपा महिला मोर्चा राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, भाजयुमो राष्ट्रीय अध्यक्ष पूनम महाजन, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर व मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार आदी उपस्थित होते. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com