gadkari advice to cm no sugar factory in state | Sarkarnama

साखर कारखान्यांना यापुढे परवानगीच देऊ नका : नितीन गडकरी

सरकारनामा ब्युरो
रविवार, 23 डिसेंबर 2018

सातारा : यापुढे राज्यात एकाही साखर कारखान्याला परवानगी देऊ नका, ऊसापासून थेट इथेनॉल निर्मितीच्याच प्रकल्पांना परवानगी द्या अशी सूचना केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना केली. पाणी आले म्हणून ऊस लावत बसू नका असा सल्लाही त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला. 

सातारा : यापुढे राज्यात एकाही साखर कारखान्याला परवानगी देऊ नका, ऊसापासून थेट इथेनॉल निर्मितीच्याच प्रकल्पांना परवानगी द्या अशी सूचना केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना केली. पाणी आले म्हणून ऊस लावत बसू नका असा सल्लाही त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला. 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या व जलसंपदा विभागाच्या वतीने जिल्ह्यातील विविध महामार्गाच्या दहा हजार कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन आणि धोम बलकवडीच्या मुख्य कालव्याचे लोकार्पण आज मंत्री गडकरी व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरिश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरिश बापट, सहकार मंत्री सुभाष देशमुख, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवतारे, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, खासदार उदयनराजे भोसले, विजयसिंह मोहिते पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्षा माधवी कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. 

गडकरी म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी व मी ठरविले आहे की महाराष्ट्रातील 50 टक्के जमीन सिंचनाखाली आणायची. त्यासाठी जुन्या व अपूर्ण प्रकल्पांना प्रधानमंत्री आणि बळीराजा कृषी सिंचन योजनेतून 560 कोटी रक्कम दिली आहे. उर्वरित दोन हजार कोटी नाबार्डचे कर्ज मंजूर करून दिले आहे. मी आणि मुख्यमंत्री विदर्भातील असल्याने पश्‍चिम महाराष्ट्राकडे लक्ष देत नाही, असा आरोप विरोधक करत आहेत. पण आम्ही दुर्लक्ष करत नाही. पश्‍चिम महाराष्ट्रासाठी आम्ही आठ हजार पाचशे कोटी रूपये दिले आहेत. आता पाणी येणार आहे म्हणून ऊस लावत बसू नका. पिक पध्दतीत बदल करा. आमची ताकद ऊसाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी वाया घालवू नका. ऊस पिकवला आणि राजू शेट्टी आंदोलनाला उभे राहतील. मात्र, मी स्पष्ट सांगतो या पुढे ऊस दरासाठी व साखरेसाठी अनुदान देता येणार नाही. आमच्याकडे साखर अनुदान मागायला येऊ नका असा आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. 

या प्रश्‍नावर मार्ग काढण्यासाठी गडकरींनी मुख्यमंत्री व सहकार मंत्र्यांना आता राज्यात तुम्ही कोणत्याही नवीन साखर कारखान्यांना परवानगी देऊ नका अशी सुचना केली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सारखेचे दर 19 रूपये आहेत. त्यामुळे साखर तयार करून ऊसाला दर देता येणार नाही. त्यामुळे कारखान्यांनी साखरेऐवजी इथेनॉल निर्मितीवर भर द्यावा. राज्यानेही ऊसापासून थेट इथेनॉल निर्मितीच्या प्रकल्पांना प्राधान्य द्यावे. किती ही इथेनॉल तयार झाले तरी, विकत घेण्याची आमची तयारी आहे. पेट्रोल डिझेलला पर्याय तयार करण्याकडे शेतकऱ्यांनी आता वळावे. त्यातून चांगला दर मिळेल. महाराष्ट्रात पाच लाख कोटींची रस्त्यांची कामे मंजूर झाली असून ही सर्व कामे उत्तम दर्जाची व भ्रष्टाचार मुक्त आहेत. त्यामुळे एकही ठेकेदार मला भेटण्यासाठी आलेला नाही असेही ते म्हणाले. 
 

संबंधित लेख