Gadakri wada will be demolished | Sarkarnama

नागपूरच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेला "गडकरी वाडा' पाडणार! 

सुरेश भुसारी
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

भाजप नेते आणि केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचा नागपुरातील गडकरी वाडा म्हणजे तेथील राजकारणाचा केंद्रिबिंदू मानला जातो. मात्र गडकरी हे काही दिवसांपूर्वीच नव्या बंगल्यात वास्तव्याला गेले आहेत. त्यामुळे सध्याचा वाडा पाडून तेथे नवीन घर बांधण्याचे काम सुरू होणार आहे.

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नागपुरातील महाल भागातील घर जमीनदोस्त होणार असून याठिकाणी नवा बंगला उभा राहणार आहे. शहराच्या राजकारणात गडकरी वाडा म्हणून प्रसिद्ध असलेली वास्तू आपल्या आपल्या ऐतिहासिक संदर्भासह काळाच्या पडद्याआड जाणार आहे. 

गेल्या 20 वर्षांपासून या वास्तूमध्ये शहराच्या राजकारणाच्या संदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहे. गडकरींचा वाडा हा महाल भागातील उपाध्ये रोडवर आहे. महाल भागात अनेक नागपूरच्या इतिहासाच्या खुणा आहेत. उपाध्ये रोड हा ऐतिहासिक संदर्भ असलेला रस्ता आहे. नागपूरकर भोसल्यांचा वाडयाला लागूनच गडकरी वाडा आहे. सध्याचा गडकरी वाडा हा भोसले काळामध्ये भोसल्यांच्या वाड्याचाच भाग होता. नागपूरकर भोसले राजांकडे घरी पूजा-होम-हवन करणारे पुरोहित-ब्राम्हण-उपाध्ये या भागात राहत होते. यामुळे या रस्त्याला उपाध्ये रस्ता असे नाव पडलेले आहे. अद्यापही भोसल्यांकडे पूजा करणारे पुरोहित व ब्राम्हण या उपाध्ये रोडवरच राहतात. गडकरींच्या ताब्यात असलेले घराचे बांधकाम मातीचेच होते. गडकरी युती सरकारमध्ये 1995 मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री झाल्यानंतर हे घर पाडण्यात आले व या घराची पुनर्बांधणी करण्यात आली. या घरात आता लिफ्ट लावण्यात आली होती. 

गडकरी वाड्यासमोर बुधवार बाजार भरतो. त्यामुळे गडकरींच्या घरी येणाऱ्यांची चांगलीच अडचण होते. हा बाजार उठविण्यासाठी बराच प्रयत्न झाले. परंतु या बाजारातील दुकानदारांनी दुकाने हटविण्यास नकार दिल्यामुळे ते तेथेच कायम आहे. यामुळे गडकरींच्या घरी येणाऱ्यांना अनेक अडचणी येतात. आता भोसल्यांच्या वाड्याचा काही भाग नागपूर महापालिकेच्या ताब्यात आहे. या भागातील रस्ते एवढे अरुंद आहे की, अनेकदा कुणाच्या घरी जायचे असल्यास गडकरी कारऐवजी स्कुटीने जाणे पसंद करतात. 
गडकरींचे पूर्वज धापेवाडा या गावाचे आहेत. धापेवाडा येथेही गडकरींचा वाडा आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही धरमपेठ भागातील घर पाडायला सुरूवात झाली आहे. गडकरींचा नवा भक्ती बंगला हा रामनगरात तयार झाला आहे. तेथे ते काही दिवसांपूर्वीच वास्तव्याला गेले आहेत. फडणवीस व गडकरी आता हाकेच्या अंतरावर आले आहेत.

संबंधित लेख