furgusion college satyanarayan blog | Sarkarnama

ऐका "सत्य' (नारायण) कथा ! 

प्रकाश पाटील 
रविवार, 26 ऑगस्ट 2018

पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी उपप्राचार्यांच्या कार्यालयात घातलेली पूजा ही नियमाला धरून नाही हे मान्य. पण, राज्यातील प्रत्येक सरकारी कार्यालयात किंवा सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अशा पूजाअर्चा बंद होतील का ? सरकारी कार्यालये ही लोकशाहीची मंदिरे आहेत याविषयी जनजागृती व्हायला हवी. विरोधाला विरोध करून काहीच हाती लागणार नाही. 

झाले असतील दहाएक वर्षे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात थोर स्वातंत्र्यसेनानी नागनाथअण्णा नायकवडी आले होते. सोबत शेतकरी, कष्टकरी होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टेबलवर असलेली गणपतीची मूर्ती पाहून अण्णा संतापलेच. 

ते ताडकन म्हणाले, "" हा गणपती आधी येथून उचला आणि त्याला घरी घेऊन जा ! कोणत्याही जातीधर्मासाठी हे कार्यालय नाही. जिल्हाधिकारी हे सर्वजाती धर्माचे असतात. त्यांनी त्यांची जातधर्म घरात ठेवूनच कार्यालयात आले पाहिजे.'' 

त्यावेळी त्या जिल्हाधिकाऱ्यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. अण्णांसमोर "ब्र' ही काढण्याची हिम्मत त्या जिल्हाधिकाऱ्यामध्ये नव्हती. एखादी गोष्ट अधिकारवाणीने सांगण्याचा अधिकार अण्णांना होता. अण्णाचं साध म्हणणं होतं की जातधर्म पाळायचा असेल तर तो घरात पाळा. जिल्हाधिकारी किंवा सार्वजनिक ठिकाणी देवधर्म, सत्यनारायण नको. खरे तर ही अपेक्षा अगदी योग्यच आहे. त्यामध्ये दुमत असण्याचे कारण नाही. पण, आपण सर्वजण तसे वागतो का हो ? तर याचं उत्तर नाही असेच द्यावे लागेल. 

देव, धर्म या दोन गोष्टी खूपच संवेदनशील आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला जी घटना दिली. त्या घटनेत काय मांडले आहे याची माहिती अधिकाऱ्यांना नसते असे समजण्याचेही काही कारण नाही. मात्र सरकारी कार्यालयातून देव हा काही जात नाही. 

मध्यंतरी शासकीय कार्यालयात देवादिकांचे फोटो असावेत की नसावेत ? यावरून मोठे वादंग उठले होते. राज्य सरकारनेही सरकारी कार्यालयात असलेले देवांचे, बाबाबुवांचे फोटो काढण्याचे फर्मान काढले होते. त्यावेळी शिवसेनेने सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. हिंदुधर्मालाच शहाणपण कशासाठी शिकविले जाते असा प्रश्‍नही काही मंडळी करीत होती. खरेतर हिंदू धर्मातील अंधश्रद्धाच दिसतात इतर धर्मातील दिसत नाहीत का ? हा प्रश्‍नही सातत्याने केला जात आहे. त्यामध्ये तथ्य असू शकते आणि ते नाकारूनही चालणार नाही. तथाकथित समाजवादी आणि कम्युनिस्टांना हा प्रश्‍न करणेही चुकीचे आहे. तसा प्रश्‍न त्यांना केला तर ते नागासारखा फणा काढतात. खरेतर आपण सर्वधर्मातील अंधश्रद्धेवर प्रहार केले पाहिजेत. 

हे सांगण्याचे कारण असे की पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजात कर्मचाऱ्यांनी उपप्राचार्यांच्या कार्यालयात घातलेल्या सत्यनारायण पुजेवरून मोठा वाद निर्माण झाला. काही मंडळींनी अशा पूजेला विरोध केला आहे. तशी पूजा गेल्या काही वर्षापासून येथे होत असते असा दावा या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनीच केला आहे. 

या वादावर पहिला प्रश्‍न आहे की अशा किती पूजाना आपण विरोध करायचा ? जी म्हणून सरकारी किंवा सार्वजनिक ठिकाणी आहेत तेथे सत्यनारायण किंवा धार्मिक विधी होत असतात. अगदी रस्त्याच्या मधोमध मस्जीद किंवा मंदिरही उभारलेले दिसते. तेथे धार्मिक कार्यक्रम चालतात ते कसे काय सुरू राहतात.

एसटी, रेल्वे, सरकारी कार्यालये किंवा त्या परिसराकडे पाहिले तर आपणास तेथे मंदिरे दिसतातच. तेथे नेहमीच धार्मिक कार्यक्रम होत असतात. अगदी पुणे बसस्थानक घ्या किंवा रेल्वे स्टेशन. तेथेही मंदिरे आहेत. सांगली बसस्थानकात मंदिर आहे. मुंबईतील प्रत्येक रेल्वे कार्यालयाच्या आवारात कोणकोणते मंदिर दिसतेच. 

सरकारी कार्यालये किंवा परिसरात बहुसंख्य हिंदूंची मंदिरे असतात. इतर धर्माचे म्हणजेच बौद्ध, ख्रिस्ती, मुस्लिमांचे देव नसतात. मात्र सरकारी आवारात हिंदूंचे होणारे हे उत्सव सर्व जातीचे कर्मचारी एकत्र येऊन साजरे करतात. महाप्रसाद करतात. स्वत: वर्गणी काढतात. अधिकारी आणि लोकही तेथे येतात.

महाप्रसादाचा लाभ घेतात असाच आपला सर्वसाधारण अनुभव असतो किंवा तसे चित्रही असते किंवा दिसते. त्यामुळे फर्ग्युसन कॉलेजमध्ये दरवर्षी होणारी पूजा हा ही त्याचाच एक भाग आहे असे वाटते. तेथे पूजा होऊ द्यायची की नाही याचा निर्णय या कॉलेजच्या व्यवस्थापनाने घ्यायचा आहे. 

सरकारी कार्यालयात देवाचे फोटो नको असे न्यायालयाने फर्मान काढले असले तरी त्याची अंमलबजावणी झाली का ? ज्याची ज्या देवावर श्रद्धा आहे. तो देव प्रत्येकाने घरात पुजला पाहिजे हे कटुसत्य असले तरी तसे होताना दिसत नाही. परिवर्तन हे काही एका दिवसात होणारी गोष्ट नाही. काही प्रथा परंपरा किंवा अनिष्ट रूढी लगेच बंद होणार नाहीत. त्यासाठी काही वेळ द्यावा लागेल. 

प्रल्हाद शिंदे यांनी सांगितलेली ऐका सत्य नारायणाची कथा लोक आजही मोठ्या भक्तिभावाने ऐकतात. ही कथा फक्त हिंदूच ऐकतात असेही समजण्याचे काही कारण नाही. सत्यनारायण घालणे म्हणजे कर्मकांड असे काही मंडळी म्हणत असली तरी सत्यनारायण पूजेला हिंदू धर्मात महत्त्व आहे. हे नाकारता येणार नाही. 

समाजातील अंधश्रद्धा दूर व्हावी यासाठी छत्रपती शाहू महाराज, संत गाडगेमहाराज, प्रबोधनकार ठाकरे, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर असोत की डॉ. नरेंद्र दाभोलकर या सर्वच महामानवांनी त्यासाठी आपले आयुष्य खर्ची केले. या महामानवाच्या आदर्शावर वाटचाल आपणास करावी लागेल. त्यासाठी आणखी काही वर्षे जावी लागतील. 

सार्वजनिक ठिकाणी धार्मिक कार्यक्रम नकोत. विरोधाला विरोध करून हाती काहीच लागणार नाही. देवाचे स्थान घरात आहे. उंबऱ्या बाहेर नाही हे प्रत्येकाच्या डोक्‍यात घालावे लागेल. जी म्हणून सरकारी कार्यालये आहेत तेथे कोणत्याच धर्माचे कार्यक्रम होऊ नयेत यासाठी समाजातील सर्व धर्मीय विचारवंतांनी पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी सांघिक प्रयत्न झाले तर अशा चुकीच्या प्रथा हळू हळू बंद होऊ शकतील. 

सरकारी कार्यालय हे लोकशाहीचे मंदिर आहे हेच तर नागनाथअण्णांना त्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगायचे होते. हे ही लक्षात घेण्याची गरज आहे.  

संबंधित लेख