Four Panels in Adinath sugar factory election | Sarkarnama

"आदिनाथ'साठी अखेर चौरंगी लढत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

आदिनाथ कारखान्याची निवडणूक तिरंगी होणार की चौरंगी याची उत्सुकता शेवटपर्यंत लागून राहिली होती. अगदी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी एक तास वेळ असताना कोणाची कोणाबरोबर युती होत नसल्याने चारही गटांनी स्वतंत्र लढण्याची घोषणा केली
 

सोलापूर  : करमाळा तालुक्‍यातील भाळवणीतील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत 21 जागांसाठी 85 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत . 

 शिवसेनेचे आमदार नारायण पाटील गट, माजी आमदार श्‍यामल बागल गट, माजी आमदार जयवंत जगताप आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे अशा चार गटांत ही निवडणूक रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले.

 तीनही पॅनेल पूर्ण असून, जगताप गटाच्या पॅनेलला जेऊर गट व संस्था मतदारसंघात दोन उमेदवार कमी पडले. तर संजय शिंदे गटाकडून एका उमेदवाराला दोन ठिकाणी उमेदवारी दिली गेली आहे. 

आदिनाथ कारखान्याची निवडणूक तिरंगी होणार की चौरंगी याची उत्सुकता शेवटपर्यंत लागून राहिली होती. अगदी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी एक तास वेळ असताना कोणाची कोणाबरोबर युती होत नसल्याने चारही गटांनी स्वतंत्र लढण्याची घोषणा केली.

 उमेदवारी अर्ज भरल्यापासून ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्‍यता होती. उमेदवारी अर्ज छाननीपासूनच कोण कोणाबरोबर युती-आघाडी करणार यावर अनेक घडामोडी घडल्या. बागल गटाचे नेते व संजय शिंदे गटाचे कार्यकर्ते यांच्यात बैठका झाल्या. तर पाटील व जगताप गटाचे कार्यकर्ते युतीबाबत चर्चा करत होते.

 माजी आमदार जयवंतराव जगताप व जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांच्यात गुरुवारी (ता. 4) बैठक झाली. त्यामुळे जगताप-शिंदे युती होण्याची आशा कार्यकर्त्यांना वाटत होती. मात्र जागा वाटपावरून ही युती झाली नाही.

त्यात शुक्रवारी (ता. 5) पुन्हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बागल-शिंदे, शिंदे-जगताप, पाटील-जगताप यांच्यात युती-आघाडी करण्यावरून बरीच खलबते झाली. शेवटच्या क्षणी नेतेमंडळी थेट फोनवरून एकमेकांशी बोलले. मात्र कोणाचीच कोणाबरोबर युती-आघाडी झाली नाही, त्यामुळे चौरंगी लढत होत आहे.
 

संबंधित लेख