फौजिया खान यांनाही लोकसभेचे वेध : परभणीत शिवसेनेला पराभूत करण्याचा दावा

फौजिया खान यांनाही लोकसभेचे वेध : परभणीत शिवसेनेला पराभूत करण्याचा दावा

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसने संधी दिली तर  परभणी लोकसभा मतदारसंघातून आगामी निवडणुकीत शिवसेनेला पराभूत करण्यासाठी माजी मंत्री फौजिया खान यांची रिंगणात उतरण्याची तयारी आहे. पारंपरिक विरोधकांसह "एमआयएम'ला रोखण्याच्या उद्देशाने अल्पसंख्याक समाजाचा चेहरा म्हणून त्यांचे नाव पुढे आले तर आश्चर्य वाटायला नको, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार निवडणूक लढवेल, असे फौजिया खान यांनी याबाबत "सरकारनामा'शी बोलताना स्पष्ट केले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत महिलांना संधी देण्याचा आग्रह पक्षाच्या नेत्यांकडे धरणार असल्याचे सांगून, परभणीतून आपण तुल्यबळ उमेदवार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

 
आगामी निवडणुकांमध्ये विशेषत: मराठवाड्यात "एमआयएम'चे आव्हान मोडीत काढण्याची रणनीती राष्ट्रवादी आखत असतानाच मतांचे विभाजन टाळण्यासाठी "एमआयएम'नेही भाजपविरोधातील आघाडीत सहभागी व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. त्यासआठी "एमआयएम'च्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. समविचारी पक्ष एकत्र आल्यास परभणीतून आपला विजय निश्चित असेल, असेही त्यांनी नमूद केले.

 
परभणी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद आहे. गेल्या चार निवडणुकांमध्ये शिवसेनेचा खासदार निवडून येत असला तरी, स्थानिक स्वराज्य संस्था मात्र, राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. त्यामुळे या पक्षाला मानणारा मतदार येथे आहे. लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे संजय जाधव निवडून आले. राठोड यांच्याविरोधातील राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांना दुसऱ्या क्रमांकाची म्हणजे, 4 लाख 51 हजार मते मिळाली होती.

फौजिया यांना याआधी राष्ट्रवादीने विधान परिषदेवर संधी दिली तसेच मंत्रीही केले होते. फौजिया खान म्हणाल्या, ""पक्षाची ताकद वाढविण्यासाठी महिला आघाडी काम करीत आहे. जातीयवादी पक्षांना रोखण्यासोबतच धर्मनिरपेक्ष सरकार आणण्यासाठी निवडणूक लढवेल. पुढील निवडणुकीत परभणीचा खासदार राष्ट्रवादीचा असेल. पक्षाने ठरविल्यास मीही लढू शकते.'' 


राष्ट्रवादीच्या महिला आघाडीतर्फे घेण्यात येणाऱ्या संविधान बचाओ, देश बचाओ' या मोहिमेच्या तयारीचा भाग म्हणून खान यांनी आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पुण्यात घेतली. खासदार वंदना चव्हाण, पक्षाचे शहराध्यक्ष चेतन तुपे, माजी आमदार कमल ढोले-पाटील, आघाडीच्या शहराध्यक्ष रुपाली चाकणकर, युवतीच्या मनाली भिलारे उपस्थित होत्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com