Five days a week lands in trouble | Sarkarnama

पाच दिवसांचा आठवडा  बारगळण्याची शक्‍यता

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 2 मे 2017

राज्यात 19 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी आहेत. कॉंग्रेस आघाडीचे सरकार असल्यापासून पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी कर्मचारी करत आहेत. पाच दिवसांचा आठवडा केल्यास कर्मचाऱ्यांचा कामाचा कालावधी दररोज 45 मिनिटे वाढवण्याचा सामान्य प्रशासन विभागाचा प्रस्ताव होता.
 

मुंबई:  भाजप-शिवसेना युती सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवासांचा आठवडा करण्याचे आश्‍वासन दिले असले, तरी केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार सुट्या कमी करण्याच्या विचारात असल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांची अडचण झाल्याचे सांगण्यात येते. 

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचे आणि दोन दिवस सुटी देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. राज्य सरकारी कर्मचारी तशी मागणीही अनेक वर्षांपासून करत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाला दिले होते. 

राज्यात 19 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी आहेत. कॉंग्रेस आघाडीचे सरकार असल्यापासून पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी कर्मचारी करत आहेत. पाच दिवसांचा आठवडा केल्यास कर्मचाऱ्यांचा कामाचा कालावधी दररोज 45 मिनिटे वाढवण्याचा सामान्य प्रशासन विभागाचा प्रस्ताव होता.

 

 केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस कार्यालयीन कामकाजाचे असावेत आणि शनिवार-रविवार जोडून सुट्टी असावी, अशी अनेक वर्षांपासूनची राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचीही मागणी होती. 

अलीकडेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची मुख्यमंत्र्यांबरोबर बैठकही झाली होती. त्या वेळी कामगारांची मागणी मान्य करण्यात आली होती. राज्य सरकारने गेल्या वर्षी एक समिती नेमली होती. या समितीने राज्य सरकारला अहवाल सादर केला असून पाच दिवसांचा आठवडा करण्याची शिफारस केली आहे. मुख्यमंत्रीही यासाठी अनुकूल होते; मात्र उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्र्यांनी शाळांच्या सुट्‌या कमी केल्या असून सरकारी कर्मचाऱ्यांच्याही सुट्यांबद्दल विचारविनिमय सुरू आहे. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्यांबाबत केंद्र सरकारही काही बदल करणार असल्याने राज्य सरकारची अडचण झाली आहे. 

गूड न्यूज !
दोन दिवसांपूर्वी मंत्रालय कर्मचारी संघटनांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा जोतिराव फुले यांच्या संयुक्‍त जयंती उत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या वेळी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज देण्याचे त्यांनी आश्‍वासन दिले होते. मुख्यमंत्री या कार्यक्रमात पाच दिवसांचा आठवडा जाहीर करणार असल्याची चर्चा प्रशासनात होती; परंतु आता असा निर्णय मुख्यमंत्र्यांना घेणे जड जाणार आहे.

संबंधित लेख