Fitness funda by MP Shirole | Sarkarnama

व्यायाम, प्राणायम, आहार आणि अध्यात्म हीच फिटनेसची चतुःसूत्री : खासदार शिरोळे 

योगिराज करे
शनिवार, 3 जून 2017

पुण्याचे खासदार अनिल शिरोळे शांत व संयमी म्हणून ओळखले जातात. महापालिकेत नगरसेवक म्हणून असताना 'मिस्टर क्‍लीन' म्हणून त्यांचा नावलौकिक आजही ते जपताना दिसतात. पुढारी म्हटल्यानंतर अनेकांच्या बोलण्या-वागण्यातून सत्ता, अहंकार, गुर्मी यांचे दर्शन घडते. पण त्याला शिरोळे अपवाद आहेत. 'लो प्रोफाइल' हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गुण त्यांच्या राजकारणातही आला आहे. त्यांची भेट झाल्यानंतर लक्षात राहतो तो त्यांच्या स्वभावातील संयम आणि समाधानी वृत्ती. 

पुण्याचे खासदार अनिल शिरोळे शांत व संयमी म्हणून ओळखले जातात. महापालिकेत नगरसेवक म्हणून असताना 'मिस्टर क्‍लीन' म्हणून त्यांचा नावलौकिक आजही ते जपताना दिसतात. पुढारी म्हटल्यानंतर अनेकांच्या बोलण्या-वागण्यातून सत्ता, अहंकार, गुर्मी यांचे दर्शन घडते. पण त्याला शिरोळे अपवाद आहेत. 'लो प्रोफाइल' हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गुण त्यांच्या राजकारणातही आला आहे. त्यांची भेट झाल्यानंतर लक्षात राहतो तो त्यांच्या स्वभावातील संयम आणि समाधानी वृत्ती. 

अनिल शिरोळे यांचा फिटनेस फंडा तीन शब्दात सांगायचा तर 'श्रद्धा, सबुरी आणि प्राणायाम' असेच वर्णन करावे लागेल. वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी शारीरिक आणि मानसिक फिटनेससाठी त्यांनी अध्यात्माचा आणि प्राणायामाचा मार्ग स्वीकारला आहे. शिरोळे यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांचे वय जाणवत नाही. 

1980 ते 2010 अशी तीस वर्षे जिममध्ये जाऊन आठवड्यातून तीनदा 'वेट ट्रेनिंग'चा व्यायाम त्यांनी केलेला आहे. संसदेत दाखल झाल्यापासून दर रविवारच्या सिंहगड ट्रेकिंगलाही त्यांना अर्धविराम द्यावा लागलेला आहे. डॉ. राजीव शारंगपाणी यांनी पाण्यात दररोज एक तास चालण्याचा दिलेला फंडा आता कधीतरी अमलात येतो आहे. 

कामाच्या आणि दौऱ्यांच्या व्यापातून फिटनेस कायम राखण्यासाठी आपण सध्या काय करतो याची माहिती देताना खासदार शिरोळे म्हणाले, "फिटनेसबाबत आपण जागरूक राहायला हवे, याची जाणीव मला कमी वयातच झाली. मी एकवीस वर्षांचा असताना माझ्या वडिलांचे अचानक हृदयविकाराने निधन झाले. माझ्या आईला आणि मावशीला डायबेटिस असल्यामुळे झालेला त्रास मी जवळून पाहिला आहे. त्यामुळे व्यायाम आणि आहाराबाबत मी प्रारंभीपासूनच जागरूक राहिलो. भरपूर फिरणे, ट्रेकिंग, वेट ट्रेनिंग, पाण्यात चालणे असे व्यायाम मी प्रदीर्घ काळ केले. त्यामुळे मी प्रकृती सांभाळू शकलो.'' 

''सध्या मी दररोज सकाळी एक तास योगसाधना करतो. भस्त्रिका, कपालभाती, उज्जायी, अनुलोम-विलोम आणि भ्रामरी असे विविध प्रकारचे प्राणायाम मी करतो. योगगुरू रामदेवबाबा यांच्या सहवासात मी प्राणायाम आणि योगासनाचे बारकावे समजावून घेऊ शकलो. एक तास प्राणायाम आणि दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा पायी चालण्याचा व्यायाम करतो. संसदेचे कामकाज संपल्यानंतर निवासस्थानी परत येताना शक्‍यतो पायी येतो. सध्याच्या धावपळीच्या वेळापत्रकात व्यायाम चुकणार नाही, याची काळजी मी घेतो,'' असेही त्यांनी सांगितले. 

माझा ओढा अध्यात्माकडे राहिलेला आहे, असे सांगून ते म्हणाले, की भैय्यू महाराजांशी माझे ऋणानुबंध 1999 मध्ये जुळले. मी त्यांना खूप मानतो. ते माझे गुरू, फिलॉसॉफर आणि गाइड आहेत. या शिवाय श्रीश्री रविशंकर, सुधांशू महाराज, रमेश महाराज, ब्रह्मकुमारीच्या शिवानीदीदी यांची प्रवचने ऐकतो. अध्यात्मामुळे विचारांची दिशा निश्‍चित होते. वैचारिक बैठक पक्की होते. सुख-दुःख, राग-लोभ, मोह-द्वेषाच्या पलीकडे जाऊन जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळते आणि मनःस्वास्थ चांगले राहाते, असे मी मानतो. त्यामुळे राजकारणातील यशापयशाकडे आपण स्थिरचित्तीने पाहू शकतो. फिटनेससोबत मनाचाही फिटनेस आवश्‍यक असतो. तो मला आध्यात्मिक मार्गातून मिळतो. 

आहारातही शिस्तबद्धपणा 
माझ्या शिस्तबद्ध जीवनशैलीत आहारही समाविष्ट आहे. दिवसाची सुरवात एक ग्लासभर गरम पाण्याने होते. प्राणायाम झाल्यानंतर पाच मिनिटांनी गव्हांकुर (100 मिली), दुधी भोपळ्याचा रस, आवळा, कोरफड आणि गिलोई रस घेतो. त्यानंतर तुळशीच्या पानांचा रस, गोधन (गोमूत्राचा अर्क काढलेला) पितो. त्यानंतर तासाभराने सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान एक ग्लास दूध पितो. नाष्ट्यामध्ये पोहे, उपमा, ऑम्लेट किंवा भुर्जी घेतो. नाष्टा कोणत्याही स्थितीत चुकवत नाही. त्यानंतर दुपारचे जेवण भूक लागेल तेव्हा घेतो. पुण्यातील प्रसिद्ध डॉक्‍टर राजीव शारंगपाणी यांनी सांगितल्यानुसार भूक लागल्याशिवाय जेवत नाही. दुपारचे जेवण व्यवस्थित घेतो. त्यात हिरव्या पालेभाज्या, मुगाची आमटी यांचा आवर्जून समावेश असतो. "माणसाने एक घास बत्तीस वेळा चावून खाल्ला पाहिजे,' असा डॉ. शारंगपाणीचा आग्रह असतो. त्याचे पालन करण्याचा प्रयत्न करतो. मटण, मासे, चिकन आवडतेच. "रेड मीट' म्हणजे मटण खाऊ नका, असा लोक आग्रह धरतात. मला मटण खिमा जास्त आवडतो. माश्‍यांमध्ये पापलेट आणि बांगडा! 

संध्याकाळी सहाच्या सुमारास एक कप चहा घेतो. दिवसभरात माझे चहाचे प्रमाण एक किंवा दीड कपापेक्षा जास्त होत नाही. रात्रीचे जेवण शक्‍यतो टाळतो. हा नियम 95 टक्के वेळा पाळला जातो. समजा भूक लागलीच तर कोणत्याही स्थितीत कार्बोहायड्रेटस म्हणजे चपाती, भात असे खात नाही. त्याऐवजी सूप किंवा रस घेतो. रात्री न जेवण्याचे कारण म्हणजे वजनावर नियंत्रण मिळविणे आहे. कारण मी जर रात्री जेवू लागलो तर वजन झपाट्याने वाढते, हे माझ्या लक्षात आले. तेव्हापासून मी रात्रीचे भोजन टाळू लागलो. आपले शरीर सुदृढ ठेवायचे असेल तर योग्य आणि संतुलित आहार पाहिजे. आपण कितीही व्यायाम, प्राणायाम केला आणि आहार योग्य नसेल तर त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे मी आहाराला फार महत्त्व देतो. व्यायाम, प्राणायम, आहार आणि अध्यात्म अशी माझ्या फिटनेसची चतुःसूत्री आहे. 

संबंधित लेख